बुलडाणा: जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या देऊळघाट येथे संचारबंदी दरम्यानही सामन्यपणे नागरिक रस्त्यावर फिरत असून पोलिस प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. दुसरीकडे पुण्या-मुंबईवरून आलेल्या अनेक जणांनी त्यांची प्रवासाची माहिती दडविल्यामुळे आरोग्य विभागासमोरही माहिती संकलनासोबतच संबंधितांना होम क्वारंटीन करण्याची समस्या निर्माण झाली आहे.परिणामी आरोग्य विभागाने गुरुवारी नवी शक्कल लढवत दोन पोलिस कॉन्स्टेबल व संबंधित प्रभागातील ग्रामपंचायत सदस्यांना सोबत घेत बाहेर गावाहून आलेल्या १८७ जणांची माहिती संकलीत केली आहेत. दरम्यान, यापैकी ९० जणांच्या हातावर होम क्वारंटीनमध्ये राहण्यासाठीचे शिक्के मारण्यात आले आहेत. मात्र त्याउपरही देऊळघाट येथे संचारबंदीच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. अद्यापही अनेक जणांनी आपण पुण्या-मुंबईवरून आलो असल्याची माहिती दडवली असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनास आरोग्य विभागाने येथे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. दुसरीकडे देऊळघाट येथील काही नागरिकांना सीएए, एनआरसी संदर्भातच माहिती आरोग्य विभागाचे अधिकारी विचारत असल्याची भिती वाटत होती. त्यामुळे त्यांच्याकडूनही सहकार्य आरोग्य विभागास मिळत नव्हते. आता मात्र परिस्थिती सुधारत असली तरी संचारबंदीमध्येही देऊळघाटमधील नागरिक खुलेआमपणे रस्त्यावर फिरत असल्यामुळे येथे खरी समस्या निर्माण झाली आहे.रात्रीचे दिवेही बंद करणारसंचारबंदीकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांना घरात राहण्याच्या दृष्टीकोणातून सांगण्यात येत आहे. सोबतच त्यानुषंगाने देऊळघाट गावातील स्ट्रीट लाईटही रात्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सरपंच गजनफरउल्ला खान यांनी दिली.
गुरुवारी ९० जणांची गृहभेट घेऊन त्यांना होम क्वारंटीनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे. दोन दिवसात देऊळघाट येथील ही मोहीम पुर्णत्वास जाईल.डॉ. अरुण जवंजाळ, वैद्यकीय अधिकारी