गेल्या १४ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या वाढल्या आहेत. जसजशा चाचण्या वाढत आहेत तसतसा कोरोना संक्रमणाचा आकडाही फुगत आहे. परिणामी कोरोना प्रतिबंधासाठी लावण्यात आलेले निर्बंध अधिक कडक करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा जिल्ह्यात समूह संक्रमणाचा धोका नाकारता येत नाही. गेल्या २६ दिवसांत मृत्यू पावलेले ३८ जण हे ६० पेक्षा अधिक वयाचे आहेत. यातील बहुतांश व्यक्ती या दुर्धर आजाराने ग्रस्त होत्या, असे डेथ ऑडिट समितीमधील एका सदस्याने सांगितले. त्यामुळे दुर्धर आजार असणाऱ्यांना कोरोनाचा धोका अधिक असल्याचे एकंदरीत आकडेवारी सांगते, तसेच आतापर्यंत जिल्ह्यात मृत्यू पावलेल्या २१५ जणांमधील अपवाद वगळता सर्वच जण हे दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याचे समोर येत आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २४ हजार १०७ झाला आहे. त्यापैकी ९ हजार २९२ बाधित हे या २६ दिवसांतील आहेत. म्हणजेच आजपर्यंत सापडलेल्या एकूण बाधितांपैकी ३९ टक्के बाधित हे या २६ दिवसांत सापडले आहेत.
--कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर प्रश्नचिन्ह--
विभागीय आयुक्तांनी गेल्या आठवड्यात बुलडाण्यात कोरोनासंदर्भाने आढावा घेतला. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्याच्या सूचना यंत्रणेला केल्या. मात्र, प्रत्यक्षात वस्तुनिष्ठ कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होते का? हा कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा नेमक्या कशा पद्धतीने हे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करते हेच स्पष्ट करण्याची वेळ आला आली आहे. सुपर स्प्रेडरच्या चाचण्याही किती झाल्या हेही अद्याप समजण्यास मार्ग नाही. मात्र, प्रशासकीय पातळीवर कोरोना संक्रमण रोखण्यासाठी बैठकांचे सत्र मात्र सुरू आहे.
--अशी आहे आकडेवारी--
एकूण चाचण्या:- ५२,८३७
एकूण बाधित:- ९२९२
एकूण बरे झालेले:- ६३०८
एकूण मृत्यू:- ३८
पॉझिटिव्हिटी रेट: १८ टक्के