काही कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना लसीकरणाविषयी उदासीनता दिसून येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ९३ टक्के हेल्थ केअर वर्कर्स व फ्रंटलाइन वर्कर्सचेच लसीकरण झाले आहे. लसीकरणात प्राधान्याने हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली. मोहिमेच्या सुरुवातीला दोन्ही गटांत चांगला उत्साह दिसून आला. मात्र, त्यानंतर या दोन्ही गटांत लसीकरणाच्या बाबतीत निरुत्साह दिसून आला. लसीकरणाच्या बाबतीत असलेली ही उदासीनता कोविड रुग्णांच्या थेट संपर्कात येणाऱ्या हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाइन वर्कर्सच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे हे लसीकरण १०० टक्के होणे आवश्यक आहे.
वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्येच जनजागृतीची गरज
लसीकरण मोहिमेंतर्गत हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाइन वर्कर्समध्ये उदासीनतेचे ठोस कारण समोर आले नाही. मात्र, काही कर्मचाऱ्यांना काेरोना झाल्याने त्यांनी लसीकरणास टाळले, तर काहींना दुसऱ्या डोससाठी ८४ दिवस पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे, याशिवाय ज्यांनी आतापर्यंत लसच घेतली नाही, अशा कर्मचाऱ्यांमध्ये कोविड लसीकरणाविषयी जनजागृती करण्याची गरज आहे.
कोविड लसीकरण
एकूण हेल्थ केअर वर्कर्स : १७,७९८
पहिला डोज : १६,८७४
दुसरा डोज : ८,७९२
फ्रंटलाइन वर्कर्स : ३६,१७९
पहिला डोज : ३५,५५९
दुसरा डोज : १५,२८५
एकही डोस न घेतलेले
जिल्ह्यात आतापर्यंत ७ लाखांवर नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये १७ हजार ७९८ हेल्थ केअर वर्कर्स, तर ३६ हजार १७९ फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ९२४ हेल्थ केअर वर्कर्स आणि ६२० फ्रंटलाइन वर्कर्स, अशा एकूण १ हजार ५४४ कर्मचाऱ्यांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतला नसल्याची माहिती आहे.