खामगाव (बुलढाणा) : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ४०० मिमी व्यासाच्या पाइपलाइनला मंगळवारी दुपारी गळती लागली. त्यामुळे शहरातील हरिफैल भागात पाण्याचा मोठा अपव्यय हाेत आहे. तांत्रिक बिघाडामुळे आगामी तीन ते चार दिवस शहराचा पाणी पुरवठा खंडीत राहणार असल्याची शक्यता नगर पालिका पाणी पुरवठा विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.
शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी तालुक्यातील गेरू माटरगाव धरणावरून जळका येथील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाईपलाइन टाकण्यात आली आहे. शुध्दीकरण केलेले पाणी जळका येथून घाटपुरी नाका येथील पाण्याच्या टाकीत आणण्यात येते. तेथून वामन नगर येथील बुस्टर पंप असलेल्या टाकीत पंपींग करून साठविलेले जाते. त्यानंतर ठराविक कालावधीत साखळी पध्दतीने या पाण्याचे शहराच्या विविध भागात वितरीत केल्या जाते.
दरम्यान, बुस्टर पंपाकडून वामन नगर टाकीकडे गेलेली ४०० मिमी व्यासाची पाईपलाइन मंगळवारी नादुरूस्त झाली. परिणामी, शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. ऐन उन्हाळ्यात ही समस्या उद्भवल्याने मंगळवारी आगामी तीन दिवस नियोजित पाणी पुरवठा ठप्प पडला आहे. त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पाइपलाइनला गळती लागल्याने मोठ्याप्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला. त्याचवेळी नगर पालिकेचे पाणी वाटपाचे नियोजन कोलमडले आहे. आगामी तीन चार दिवस शहराचा पाणी पुरवठा लांबणीवर पडणार असल्याची शक्यता नगर पालिका पाणी पुरवठा विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.
दुरूस्तीस प्रारंभपाइपलाइनला गळती लागल्याचे समजताच नगर पालिका पाणी पुरवठा विभागाकडून गळती लागलेल्या ठिकाणाचे स्थळ निरिक्षण करण्यात आले. बुस्टर पंपावरील व्हॉल्व बंद करून पाइप लाइनच्या दुरूस्तीस प्रारंभ करण्यात आला आहे.