बुलढाणा : आर्थिक विवंचनेत सापडलेल्या बुलढाणा शहरातील ५४ वर्षीय व्यावसायिकाने निर्माणाधीन इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. शिरीषकुमार वर्धमान गणोरकर असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर पाेलिसांनी १० सप्टेंबरला आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे.
शिरीषकुमार वर्धमान गणोरकर, रा. चैतन्यवाडी यांचे भारत मशिनरी नावाचे दुकान आहे. त्यांनी जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात खते, पीव्हीसी पाइप, ठिबक संच असा भरपूर माल विक्रीसाठी खरेदी केला होता. परंतु, तो विक्री न झाल्याने माल तसाच पडून होता. त्यामुळे गणोरकर गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून चिंतेत होते. ते ९ सप्टेंबरला दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कोणालाही न सांगता घरून निघून गेले हाेते.
त्यांचा शोध नातेवाइकानी घेतला असता ते चैतन्यवाडी येथे निर्माणाधीन इमारतीच्या खाली पडलेले आढळले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांचा मुलगा सजल शिरीषकुमार गणोरकर यांनी माहिती दिल्याने बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात १० सप्टेंबर रोजी सकाळी आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.