बुलढाणा: एका मालवाहू वाहनाच्या कॅबिनमध्ये शॉर्ट सर्कीट होऊन अचानक धूर निघून पहातापहाता आग लागल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकातील पेट्रोल पंपासमोर घडली. शहरातील मध्यवस्तीत असलेल्या जयस्तंभ चौकातील पेट्रोल पंपासमोर एक मालवाहू वाहन ६ फेब्रुवारी रोजी सकाळी येऊन थांबले आणि अचानक या वाहनाच्या कॅबीन खाली असलेल्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने अचानक धूर निघायला सुरूवात झाली. लोगलत या वाहनाने पेट घेतला.
हे निदर्शनास येताच पेट्रोल पंपावरील अग्निरोधक यंत्राद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तोवर बुलढाणा पालिकेचे अग्निश्यामक दलही तेथे पोहोचले आणि मालवाहू वाहनाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. परंतूतोवर कॅबिनचा बराच भाग जळून खाक झाला होता. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही हानी झाली नाही. परंतु याप्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती.