खामगाव: माहेरवरून पैसे आणि सोन्याची पोत आणण्यासाठी तगादा लावत, एका २७ विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारीनुसार, खामगाव येथील एमआयडीसी परिसरातील गौरानगर माहेर असलेल्या सुषमा राहुल बंबटकार (२७) यांचा विवाह जळगाव जामोद येथील राहुल समाधान बंबटकार याच्याशी झाला. विवाहानंतर विवाहिता २५ मे २०२२ ते ८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत सासरी नांदावयास गेली. सुरुवातीचे काही दिवस चांगले वागविल्यानंतर सासरच्या मंडळीने सोन्याची पोत आणि पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. सासरच्या जाचाला कंटाळून आपण संसार टिकविण्यासाठी दोन लाख रुपये आणून दिले. मात्र, त्यानंतरही सासरच्या मंडळीच्या वागणुकीत बदल झाला नाही. पैसे व सोन्यासाठी छळ सुरूच असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.
तसेच जोपर्यंत पैसे व सोने मिळत नाही. तोपर्यंत वागविणार नाही, अशी धमकी दिल्याचा आरोप केला. या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी पती राहुल समाधान बंबटकार, सासरा समाधान शंकर बंबटकार, सासू सविता समाधान बंबटकार तिघेही रा. माळीखेल, जळगाव जामोद, नणंद वंदना नीलेश इंगळे आणि नंदोई नीलेश शालिग्राम इंगळे दोघेही रा. निवारा कॉलनी अकोला अशा पाच जणांविरोधात भादंवि कलम ४९८(अ), ३२३, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोहेकॉ दिनेश घुगे करीत आहेत.