बुलढाणा : महापुरुषांविषयी दोघांनी इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह चॅटींग करुन धार्मिक भावना दुखावल्या. यामुळे जातीय तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरुन २० मार्च रोजी दोन जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीमध्ये एका विधी संघर्ष बालकाचा समावेश आहे.
बिबी पोलीस स्टेशन अंतर्गंत येणाऱ्या किनगाव जट्टू येथील देविदास अंबादास मोरे (५०) यांनी तक्रार दिली की, त्यांच्या गावातील वैभव अशोक कायंदे आणि एका अल्पवयीन मुलाने तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत इंन्स्टाग्रामवर महापुरुषांविषयी आक्षेपार्ह व अपमानजनक चॅटींग करुन धार्मिक भावना दुखविल्या. यामुळे जातीय तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याबाबत आरोपीस समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी तक्रारदारांसोबत अरेरावीची भाषा केली. अशा तक्रारीवरुन बिबी पोलिसांनी वैभव अशोक कायंदे आणि एका विधी संघर्ष बालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सदानंद सोनकांबळे हे करीत आहेत.