खामगाव : हार्वेस्टर रस्त्यात अडवून दोन चालकांना मारहाण करण्यात आली. तसेच हार्वेस्टरचे नुकसान करण्यात आले. ही घटना खामगाव तालुक्यातील कोलोरी शिवारातील गव्हाण फाट्यानजीक गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी चौघांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत हार्वेस्टर मालक दीपक जगन्नाथ टिकार (३२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्याकडे एचआर ०९ - जी ४८०६ क्रमांकाचे हार्वेस्टर आहे. या हार्वेस्टरद्वारे शेतातील कामगिरी करून चालक पवनकुमार हारजित गिर व गुरप्रीतसिंग जनकराज हे दोन्ही चालक हार्वेस्टर घेऊन कोलोरी शिवारातून परतत होते. दरम्यान, संघपाल भोजने (रा. वरूड), आनंद जानराव तेलगोटे (रा. तरोडा) आणि इतर दोघांनी कोलोरी शिवारातील गव्हाण फाट्यावर हार्वेस्टर अडविले. दोन्ही चालकांना शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हार्वेस्टरवर दगड फेकून हार्वेस्टरच्या डाव्या बाजूची काच फोडली व दर्शनी भागावर दगडफेक करून हार्वेस्टरचे ५ हजार रुपयांचे नुकसान केले. चालक पवनकुमार हारजित गिर याचा मोबाइल जबरदस्तीने खेचून फेकून दिला. यावेळी झालेल्या झटापटीत शेतमालक कृष्णा टिकार यांनी दिलेले भाड्याचे २५ हजार २०० रुपये कुठेतरी पडल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी चौघांविरोधात भादंवि कलम ३४१, ३२३, ४२७, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. गणेश जाधव करीत आहेत.