खामगाव: स्थानिक वामन नगर रस्त्यावरील एका रेडीमेड कापडाचे दुकान फोडून सुमारे चार लाख रुपयांचा माल लंपास केला. ही घटना सोमवारी सकाळी उजेडात आली. येथील टिचर कॉलनी भागातील रहिवासी मो. आकीब हुसेन आबिद हुसेन (३२) यांचे वामन नगर रस्त्यावरील इंदिरा गांधी नगर परिषद कॉम्पलेक्समध्ये रेडीमेड कापडाचे दुकान आहे.
सणासुदीनिमित्त त्यांनी दुकानात रेडीमेड कापडाचा माल भरला होता. दरम्यान रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. दुकानातील सुमारे चार लाख रुपयांचा नवीन कापडांचा माल लंपास केला. सोमवारी सकाळी शेजाºयांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत मो. आकीब यांना माहिती दिली. त्यानंतर आकीब यांनी दुकानाची पाहणी केली. खात्री पटल्यानंतर शहर पोलिसांत चोरीची तक्रार दाखल केली. शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.