खामगाव : सोयाबीनचे भाव प्रचंड पडले असून भाव मिळण्यासाठी आता हत्यारच हाती घ्यावे लागेल, यासाठी अकोला जिल्ह्यातील पिंपळखुटा येथील शेतकऱ्याने खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हातात कोयता घेऊन शासनाविरुद्ध प्रतीकात्मक आंदोलन केले. यावेळी त्यांच्यासोबत शेतकरीही सहभागी झाले.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी शुक्रवारी सोयाबीन घेऊन आले होते. यावेळी सोयाबीनला अल्प भाव मिळत असल्याने त्यापैकी अनेक जण एकत्र आले. त्यापैकी अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील पिंपळखुटा येथील एका शेतकऱ्याने जोरदार घोषणा दिल्या.
आतापर्यंत अनेकदा मागणी केली. मात्र, भाव वाढला नाही. त्यातच सोयाबीनचे अत्यल्प उत्पादन झाले. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणे शक्य नाही. या परिस्थितीत किमान सहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा, अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली. केवळ मागणी केल्याने भाव मिळत नाही, आता हत्यार हाती घ्यावे लागेल का, असे म्हणत प्रतीकात्मकपणे कोयता हातात घेत निदर्शनेही केली. यावेळी शहर पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेत कारवाई केली.