मेहकर : शहरातील रामनगरजवळील लक्ष्मी नारायण नगर, महादेव वेटाळ व गणपती गल्लीत अज्ञात चोरट्यांनी बुधवारी रात्री धुमाकूळ घालत दोन लाख २८ हजार ७३२ रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी मेहकर पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लक्ष्मी नारायण नगरातील प्रा. निवृत्ती विठ्ठल कापसे हे ८ मे राेजी सायंकाळी परिवारासह चिखली येथे गेले होते. या संधीचा लाभ घेत अज्ञात चोरट्यांनी घराची कडी तोडून घरातील नगदी २५ हजार रुपये, शॉट पोथ, सोन्याची बाळी, चांदीचे दागिने, लहान मुलांचे कडे, चेन व मुंडवाळे किंमत ६४,४०० असा ९०,४०० रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यानंतर चोरट्यांनी याच नगरातील जीवनकुमार भिकमचंद शर्मा यांच्या घराची कडी तोडून नगदी २५ हजार रुपये व ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी किंमत ५५ हजार असा ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. पुढे याच नगरातील सुजीत हरिनारायण सावजी यांच्यासुद्धा घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला, मात्र काही सापडले नाही़ तसेच कालच्याच रात्री महादेव वेटाळातील गजानन भगवान सुर्वे हे रुग्णालयात गेले असता त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करीत पाच हजार रुपये राेख व साेन्या-चांदीचे दागिने असा ६९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. तर गणपती गल्लीतील गणपतीच्या डोक्यावरील चांदीचा टोप किंमत १४ हजार ३३२ रुपये चोरट्यांनी पळवला आहे. एकूण दोन लाख २८ हजार ७३२ रुपयांचा माल चोरी गेल्याने चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. चोरीचा तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश भगवान कड करीत आहेत.