बुलढाणा (खामगाव): एका सहकारी शिक्षिकेच्या नावाने प्रेम कविता लिहून सोशल मिडीयावर व्हायरल करून एका विवाहितेचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी विवाहित शिक्षिकेच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी ५२ वर्षीय इसमा विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
खामगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील एका शाळेत कार्यरत असलेल्या ५२ वर्षीय इसमाने प्रेम कविता लिहीली. ही कविता सोशल मिडीयावर विवाहित शिक्षिकेच्या नावाने व्हायरल केली. तसेच विवाहित शिक्षिका शाळेत कर्तव्यावर असताना तिच्याकडे टकटक पाहून तिचा विनयभंग केला. ३० नोव्हेंबर २०२१ ते ३० ऑगस्ट २०२२ या कालावधीत विवाहित शिक्षिकेला वाईट तसेच जवळीक साधण्याच्या उद्देशाने वेळोवेळी त्रास दिला. अशी तक्रार सहकारी शिक्षिकेने ग्रामीण पोलीसांत दिली. या तक्रारीवरून ग्रामीण पोलीसांनी ५२ वर्षीय इसमाविरोधात भादंवि कलम ३५४(अ), ३५४ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला. शेगाव येथील घटनेनंतर लागलीच खामगाव येथेही शिक्षिकेच्या विनयभंगाचे प्रकरण शिक्षण क्षेत्रात घडले. त्यामुळे शिक्षणक्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.