बुलढाणा : आई एक नाव असते, जगावेगळा भाव असते, या प्रेमळ ओळींचा प्रत्यय आला, सहा वर्षांपासून ताटातूट झालेल्या मायलेकीच्या भेटीने. ही भेट घडून आली बुलढाण्यातील दिव्य सेवा प्रकल्पाच्या टीममुळे. अवघ्या २२ दिवसांची असताना सोडून गेलेली आई सहा वर्षांनंतर डोळ्यांसमोर दिसली अन् मुलीच्या आनंदाला पारावार उरला नाही.
ही एक हृदयस्पर्शी घटना बुलढाणा येथील दिव्य सेवा प्रकल्पाच्या मदतीने पंढरपूर येथे घडली. मनोरुग्ण असलेल्या त्या महिलेला उपचारानंतर बरे करून बुलढाण्याच्या दिव्य सेवा प्रकल्पाने पंढरपूर येथे सुखरूप पोहचविले आहे. जानेवारी २०२३ मध्ये लातूर पोलिसांच्या मदतीने सुरेखा संजय पसरंडे ही मनोयात्री महिला बुलढाणा येथील दिव्य सेवा प्रकल्पात दाखल झाली होती. या महिलेची परिस्थिती बिकट होती. मात्र होत असलेल्या उपचारांना प्रतिसाद मिळत असल्याने काही काळातच तिच्या मनोवस्थेत आमूलाग्र बदल झाला. केवळ ॲलोपॅथिक गोळ्या नाहीतर दिव्य सेवा प्रकल्पातील सेवावृत्तींनी पाच महिने केलेली सेवा फळाला आली. ही मनोयात्री महिला बरी झाली होती. मग तिला आपलं घर आठवायला लागले.
नांदेडमध्ये माहेर आणि पंढरपूरमध्ये सासर असल्याची माहिती तिने दिली. या महिलेचे घर शोधून देण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेण्यात आला. तिकडे अंथरुणात अवघ्या २२ दिवसांचे बाळ आईपासून दुरावले होते. वडील संजय देखील मानसिक आजारामुळे पत्नी सोडून गेल्याने सैरभैर झाले होते. तब्बल सहा वर्षे वडिलांनी मुलीच्या संगोपनाची जबाबदारी पार पाडली. पितृत्वाच्या छायेत चिमुकली मोठी होत गेली. मात्र तिची मातृत्वाची ओढ कायम होती. अखेर तिच्या घराचा पत्ता सापडला आणि ती सुखरूप घरी पोहोचली. महिलेला सुद्धा पती रूपाने विठ्ठल भेटला. या भावनात्मक प्रसंगाने उपस्थितांच्या डोळ्यात देखील आनंदाश्रू तरळले. सुरेखा संजय पसरंडे हिला पोहोचवण्यासाठी डॉ. सुकेश झवर, ज्योतीताई पाखरे, प्रभू दयाल चव्हाण, डॉ. गणेश गायकवाड, डॉ. गजेंद्र निकम, ग्रामीण ठाणेदार गरड यांनी वाहनाच्या इंधनासाठी मदत केली. दरम्यान, दिव्य सेवा प्रकल्पाचे अध्यक्ष अशोक काकडे व टीम पंढरपुरात दाखल झाली.
महिला पोहचली सुखरूप
पंढरपूर येथील सुरेखा संजय पसरंडे या महिलेला लातूर येथून राहुल पाटील, सय्यद मुस्तफा यांनी येथील दिव्य सेवा प्रकल्पात दाखल केले होते. ती बरी झाल्यानंतर तिला अशोक काकडे, आशिष, विशाल ग्यारल यांनी सुखरूप घरी पोहोचविले.