खामगाव (बुलढाणा) : पूर्ववैमनस्यातून काका-काकूच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोषी पुतण्याला बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. खामगाव जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश ए.एस.वैरागडे यांनी बुधवारी हा महत्वपूर्ण निकाल दिला. मंगळवारी संबंिधताला दोषी ठरवून न्यायालयाने शिक्षेचा निकाल राखून ठेवला होता. दरम्यान, बुधवारी पुतण्याला जन्मठेपेसह १० हजार रूपये दंड, दंड न भरल्यास ३ महिन्यांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.
पूर्ववैमनस्यातून प्रल्हाद शिवराम पाचपोर आणि त्यांचे भाऊ समाधान शिवराम पाचपोर यांच्या सुरू असलेल्या वादादरम्यान अरविंद शिवराम पाचपोर याने अंगावर ट्रॅक्टर घालून नात्याने काका असलेल्या समाधान शिवराम पाचपोर आणि त्यांच्या पत्नी प्रमिलाबाई पाचपोर यांना २१ जून २०१४ रोजी जखमी केले होते. याप्रकरणी घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार अनंता वसंता पांढरे यांनी हिवरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी तपासाअंती दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. दोषारोप पत्र सिध्द करताना न्यायालयाने ११ साक्षीदार तपासले. जखमी पती पत्नी, बयाण नोंदविणारे डॉक्टर व तपास अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. डॉ.कल्याणी पांढरे, आणि तपास अधिकारी सपोनि व्ही. आर. पाटील यांची साक्ष जखमींच्या साक्षीला पूरक असल्याने जिल्हा सत्र न्यायाधीश ए.एस.वैरागडे यांनी अरविंद पाचपोर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. खटला सुरू असतानाच दुसरा आरोपी प्रल्हादचा मृत्यू झाला. सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील वसंत भटकर यांनी काम पाहीले. कोर्ट पैरवी नापोकॉ संतोष धनोकार यांनी केली.