बुलढाणा : दिल्लीतील कुख्यात गुंड नीरज बवानाच्या नावावर चक्क आपल्या मावस काकांना ४० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पुतण्या व त्याच्या मित्रास बुलढाणा पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, दिल्ली, हरियाणा, पंजाब राज्यांत कार्यरत असलेल्या बवनाच्या नावाने बुलढाण्यात खंडणी मागण्यात आल्यामुळे पोलिसही चक्रावून गेले होते. दरम्यान, पाच दिवसांत तांत्रिकदृष्ट्या तपास करत आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी आदित्य राजेश कोलते (बुलढाणा) आणि ऋषीकेश शिंदे (रा. किन्होळा) या दोघांना बुलढाणा शहर पोलिसांनी अटक केली आहे. '
आदित्यचे मावस काका पंकज अरुण खर्चे (रा. केशवनगर) यांना ही धमकी देण्यात आली होती. पंकज अरुण खर्चे म्युच्युअल फंड ड्रिस्ट्रिब्यूटर म्हणून काम करतात. पंकज खर्चे यांना ८ जुलै रोजी एका मोबाइल क्रमांकावरून धमकी आली होती. ‘दिल्लीतील गँगस्टर नीरज बवनाचा आपण उजवा हात असून, मला ४० लाख रुपये दिले नाही तर तुझा गेम करून टाकील. तुझी सर्व कुंडली माझ्याकडे आहे’, अशी धकमी दिली गेली होती. ९ जुलै रोजी गाडीची काच फोडून एक चिठ्ठीही ठेवण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
दिल्लीच्या गँगस्टरला बुलढाण्यात काय इंटरेस्ट!
पोलिसांनी प्रकरणात गुन्हा दाखल करून घेतला. परंतु, दिल्लीच्या गँगस्टरला बुलढाण्यात काय इंटरेस्ट आहे, हा पहिला प्रश्न पोलिसांना पडला होता. परंतु, जेव्हा पोलिसांनी प्रकरणाचा तांत्रिकदृष्ट्या तपास सुरू केला, तेव्हा संपूर्ण प्रकरणाचे त्यांना आकलन होऊ लागले. धमकी देणारे हे तक्रारकर्ते खर्चे यांच्या जवळचेच असल्याचे समोर येत होते. सोबतच पंकज खर्चे यांनी पुण्यात फ्लॅट घेतलेला असून, त्याच्या खरेदीसाठीचे ४० लाख रुपये त्यांच्याकडे असल्याचेही आदित्यला माहीत होते, असे अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
दोन्ही आरोपी आयटीआयमध्ये होते एकत्र
या प्रकरणात अटक करण्यात आलेला आदित्य राजेश कोलते (१८) आणि ऋषीकेश शिंदे हे दोघेही आयटीआयमध्ये सोबत होते. ते चांगले मित्रही होते. या प्रकरणात ऋषीकेश शिंदेच्या मोबाइलचा वापर करून आदित्य कोलतेने मावस काका पंकज खर्चे यांना धमक्या दिल्या होत्या. ऋषीकेश शिंदेजवळील सिम कार्ड हे त्याच्या काकांचे होते. या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडील मोबाइलही जप्त करण्यात आला आहे.