देऊळगाव राजा : एक महिन्याच्या सुटीवर आलेल्या मेहुना राजा येथील भारतीय तिबेट सीमा सुरक्षा पोलिस दलातील जवान मनोहर संतोष जाधव यांचे १० जून राेजी आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर ११ जून राेजी अंत्यसंस्कार करण्यात आले. दाेन दिवसांची सुटी शिल्लक असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
मेहुना राजा मनोहर संतोष जाधव भारतीय तिबेट सीमा सुरक्षा पोलिस दलात छत्तीसगड येथे कर्तव्यास होते. ते एक महिन्याच्या सुटीवर गावाकडे आले होते. १२ जून रोजी सुटी संपून कर्तव्यास हजर होणार असतानाच अल्पशा आजाराने त्यांचे १० जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.
छत्तीसगड येथून आयटीबीपी ५३ बटालियनमधून नारायणपूर जिल्हा छत्तीसगडमधून इन्स्पेक्टर कृष्णा धामी सब, हवालदार रामचंद्र, हवालदार कुमार वैजंत्री, शिपाई अश्विनी कुमार, शिपाई अक्षय शिंदे, शिपाई शुभम फडतरे, शिपाई श्रीकांत गोले, शिपाई कृष्णा दरेकर, शिपाई इंद्रजीत डोईफोडे, शिपाई पविंदर सिंग, शिपाई चंद्रभान, शिपाई सुनील रामदास चाटे, अविनाश कवळे, विनायक जायभाये, जगन्नाथ जायभाये, मनोज शेगावकर आदींनी जाधव यांना सलामी मानवंदना देण्यात आली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी अश्विनी व दोन वर्षांची मुलगी व दाेन भाऊ असा परिवार आहे. अंत्यविधीच्या वेळी जाधव यांच्या आई आणि पत्नीने हंबरडा फाेडल्याने अनेकांचे डाेळे पाणावले हाेते.
सन्मान रॅलीत अनेकांनी वाहिली श्रद्धांजली
देऊळगाव राजाच्या जालना बायपासपासून ते अमर जवान स्मारकापर्यंत देशभक्तीच्या सुरात अमर जवान सन्मानाची रॅली काढण्यात आली. यादरम्यान शेकडाे नागरिकांनी नमन करून पुष्पांजली वाहिली.
अमर जवान स्मारकासमोर देऊळगाव राजा वासीयांनी श्रद्धांजली अर्पण केली. अंत्यविधीच्या वेळेस विभागाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे, उपसभापती दादाराव खारडे, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मनोज कायंदे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गंगाधर जाधव, डॉक्टर सुनील कायंदे, प्रकाश गीते, गजानन पवार, एल.एम. शिंगणे, शिवाजी कुहिरे, दिलीप खरात, राजू चित्ते आदींसह विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.