चिखली (बुलढाणा) : खामगावकडून चिखलीकडे येणाऱ्या एक ट्रकने विरूध्द दिशेने येणाऱ्या दुचाकीस जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना ९ जूनच्या सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास चिखली खामगाव रोडवरील सोमठाणा फाट्यावर घडली आहे.वैभव प्रदीप मराडे (वय २५, रा. ईसाेली) असे मृतकाचे नाव आहे.
चिखली तालुक्यातील ईसोली येथील वैभव प्रदीप मराडे (वय २५) व ऋषिकेश दत्तात्रय झरेकर हे दोघेजण शनिवारी सायंकाळी ५ वाजता दुचाकी क्रमांक एमएच २८ एवाय ८०४७ ने चिखलीहून ईसोली या आपल्या गावाकडे जात हाेते़ चिखली-खामगाव रोडवरील सोमठाणा फाट्या समोर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास विरूध्द दिशेने चिखलीकडे येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच ४२ बी. ८३०४ ने दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात वैभव प्रदीप मराडे याचा मृत्यू झाला आहे. ऋषिकेश दत्तात्रय झरेकर गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे. याबाबत मृतकाचा काका श्रीकृष्ण भगवान मराडे यांनी चिखली पोलीसांत दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरूध्द कलम ३०४ अ २७९, ३३७ भादंवि नुसार गुन्हा दाखल झाला आहे. तपास एएसआय शशिकांत धारकरी करीत आहेत.