मुकुंद पाठक
लोकमत न्यूज नेटवर्क, सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) : 'शान्ताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्ण शुभांगम् ।' या श्लोकात वर्णन असल्याप्रमाणे श्री विष्णूंची अत्यंत देखणी मूर्ती मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे सापडली आहे. १५ जूनला शिव मंदिराचे उत्खनन सुरू असताना समाधी मंदिराजवळ ही मूर्ती असल्याचे पुरातत्त्व विभागाच्या लक्षात आले. सहा दिवसानंतर प्रत्यक्ष सुंदर मूर्ती दिसून आली.
मूर्तीचे वैशिष्ट्य काय?- ही मूर्ती अकराव्या किंवा बाराव्या शतकातील असू शकते, असा प्राथमिक अंदाज भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ही मूर्ती १.७ मीटर लांब असून, साधारण ३ फूट उंच आहे. मूर्तीच्या चौरंगावर सुंदर नक्षीकाम आढळते.- चौरंगावर विश्रामावस्थेतील श्री विष्णूंची मूर्ती, त्यावरील नक्षीकाम लक्ष वेधून घेते. मूर्तीच्या नाभीतून ब्रह्मदेवाची उत्पत्ती, पायाजवळ सेवारत लक्ष्मी माता, शंख, चक्र, गदा, पद्म मूर्तीच्या प्रभावळ भागात समुद्रमंथनाचा सुंदर देखावा, मंथनातून निघालेले रत्न, वासुकी नाग अशी एक ना अनेक सुंदर कलाकुसर मूर्तीमध्ये आहे.
मूर्तीवर चालुक्य काळाचा प्रभाव?शेषशायी विष्णू मूर्ती १२ व्या शतकातील असल्याचे निदर्शनास आले. येथे त्या काळात निर्माण झालेल्या मूर्ती याच शैलीच्या असून, या मूर्तीवर चालुक्य काळाचा प्रभाव दिसतो. नीलकंठेश्वर मंदिरातदेखील याच शैलीची विष्णूमूर्ती आजही पाहायला मिळते. येथील रामेश्वर मंदिरही पुरातन आहे. प्राचीन काळात सिंदखेडराजापूर्वी या शहराचे नाव सिद्धपुर असल्याचे शीलालेख उपलब्ध आहेत. - प्राचार्य डॉ. संजय तुरुकमाने, इतिहासतज्ज्ञ, सिंदखेडराजा