अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव (जि. बुलढाणा): अकोला जिल्ह्यातील पारस येथील श्री बाबुजी महाराज संस्थानात रविवारी रात्री घडलेल्या घटनेत खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार येथील एका ६५ वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. दु:ख निवारण करण्यासाठी दरबारात जाणे, महिलेची जीवन यात्रा संपविणारे ठरले. पार्वताबाई महादेव शुशीर असे मृतक महिलेचे नाव आहे.
अकोला जिल्ह्यातील पारस येथे श्री बाबूजी महाराज संस्थान आहे. या संस्थानात दर रविवारी दु:ख निवारण दरबार भरतो. रविवारी येथे दरबारासाठी भाविक मोठ्याप्रमाणात एकत्र जमले. दरम्यान, साडेसात वाजताच्या सुमारास सोसाट्याच्या वार्याने कडूलिंबाचे भलेमोठे झाड टिनपत्र्याच्या सभामंडपावर कोसळले. यात ठार झालेल्या सात भाविकांमध्ये खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार येथील महिलेचा समावेश आहे. या महिलेची रविवारी उशिरा रात्री ओळख पटली. भालेगाव येथून दरबारासाठी सहकारी काही महिलांसह पारस येथे गेल्या असता ही घटना घडली. मृतक महिलेची ओळख पटल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. मृतक महिलेच्या पश्चात एक मुलगी, एक मुलगा सुन, नातवंड असा आप्त परिवार असून, भालेगाव बाजार, कुंबेफळ येथील वार्ताहर गजानन सुशीर यांच्या त्या मातोश्री होत्या.
दरबारात नियमित हजेरी
खामगाव तालुक्यातील विविध गावांतील महिलांनी पारस येथील दु:ख निवारण दरबारात नियमित हजेरी असते. रविवारीही खामगाव तालुक्यातील भालेगावसह कुंबेफळ, टाकळी तलाव, ढोरपगाव येथील काही महिलांनी हजेरी लावली होती.