- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: सध्या राज्यभर गुरांचे आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतू पशुपालक आधार नोंदणी करण्यासाठी प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आधार नोंदणीअभावी गुरांच्या लसीकरणासही अडचणी येत आहेत. गुरांच्या खरेदी विक्रीलाही आधार कार्ड आवश्यक केले आहे. त्यामुळे एक प्रकारे गुरांच्या खरेदी विक्रीला ‘आधार’ची वेसण लावण्यात आल्याचे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.गुरांचे रक्षण व संगोपनाच्या अनुषंगाने गुरांचेही आधार कार्ड काढण्यात येतात. गायींच्या संरक्षणासाठी ओळखपत्र क्रमांक (यूआयडी) देण्याची ही योजना आहे. त्यामुळे गायींच्या हालचालींचा मागोवा घेणे किंवा त्यांचा ठावठिकाणा शोधून काढणे शक्य होणार आहे. गायींचे वाण, वय, रंग व इतरही बाबींवरही या ‘यूआयडी’मुळे लक्ष ठेवता येईल, या उद्देशाने गुरांचे आधार कार्ड काढण्याचे काम पशुसंवर्धन विभागाकडून राज्यपातळीवर सुरू आहे. गुरांचे आधार नंबर असल्याशिवाय त्यांचे लसीकरण करता येत नाहीत. त्यामुळे लम्पी किंवा इतर अजारांवर लसीकरण करण्यासाठी गुरांचे आधार नंबर विचारण्यात येतात. परंतू ज्या गुरांना आधार नंबर नाही, अशा गुरांचे लसीकरण केल्या जाऊ शकत नाही. त्यामुळे पशुपालकच नव्हे, तर पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारीही अडचणीत सापडतात. आधार नसल्याने लसीकरण करायचे कसे हा प्रश्न आहे. गुरांची खरेदी विक्रीही आधार कार्ड असल्याशिवाय करण्यात येऊ नये, अशा सुचना आहेत. त्यामुळे पशुपालकांनीही गुरांची खरेदी करण्यापूर्वी त्या गुराचा आधार नंबर घेणे आवश्यक आहे.
गुरांचे लसीकरण असेल किंवा खरेदी विक्री असेल, या सर्व प्रक्रियेसाठी त्या गुरांची आधार नोंदणी आवश्यक आहे. पत्येक पशुपालकांनी आपल्याकडे असलेल्या सर्व गुरांची आधार टॅगिंग नोंदणी करून घ्यावी.- डॉ. की. मा. ठाकरे, पशुवंर्धन अधिकारी, बुलडाणा.