खामगाव (बुलडाणा): भाकपाप्रणित अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने ११ मे रोजी राज्याचे कृषी, फलोत्पादन मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या घरावर ह्यआसूड मोर्चाह्ण काढण्यात आला. या मोर्चात राज्यभरातील किसान सभेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने आसूड मोर्चापूर्वी नगर परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर ह्यआसूड परिषदह्ण घेण्यात आली. या परिषदेला किसान सभेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य कॉ. अशोक ढवळे, प्रदेशाध्यक्ष किसन गुजर, प्रदेश सचिव अजीत नवले, कॉ. दादा रायपुरे आदींसह राज्य कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना कॉ.अशोक ढवळे यांनी राज्यातील भाजपा सरकार हे भांडवलदारांचा विकास करणारे व श्रमिकांना भकास करणारे असल्याचे तसेच तसेच शेतकऱ्यांप्रती संवेदनशील नसल्यामुळेच राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण ४२ टक्क्यांनी वाढल्याचा आरोप केला. आसूड परिषदेनंतर दुपारी तीन वाजता मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत हा मोर्चा कृषीमंत्री फुंडकर यांच्या चांदे कॉलनी स्थित घराकडे वळला. दरम्यान जलंब नाका भागात बॅरिकेट लावून पोलिसांनी मोर्चा अडविला व निवेदन देण्याच्या सूचना केल्या. परंतु पोलीसांचे बॅरीकेडस बाजूला सारत मोर्चा पुढे सरकला. यावेळी कृषीमंत्री परदेश दौऱ्यावर असल्यामुळे त्यांच्या घरासमोर लावण्यात आलेल्या बॅरीकेडसला मोर्चेकऱ्यांनी निवेदन चिकटवले. दानवेंविरोधात घोषणाबाजी !भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा यावेळी निषेध करण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी दानवे, कृषीमंत्री फुंडकर यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
कृषीमंत्र्यांच्या घरावर धडकला ‘आसूड मोर्चा’!
By admin | Published: May 12, 2017 7:51 AM