लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : लोकसभा निवडणुकीतील बुलडाण्याच्या बिग फाईटच्या प्रचाराची समाप्तीही स्टार प्रचारकांच्या दोन सभांचा एकाच दिवशी तकडा देऊन होणार आहे. प्रचार संपण्याच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे बुलडाण्यात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्याच्या सांस्कृतिक राजधानी चिखलीमध्ये सभा घेत आहे.लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होवून जवळपास १४ दिवस झाले आहेत. प्रारंभी युती व आघाडीच्या उमेदवारासह रिंगणातील एकूण १२ उमेदवारांनी थेट मतदारांशी संवाद साधत तथा कोपरा सभा घेत प्रचार प्रारंभ केला होता. दरम्यान आठ एप्रिल नंतर जिल्ह्यात खर्या अर्थाने स्टार प्रचारकांच्या सभा सुरू झाल्या होत्या. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांची जिल्ह्यात प्रथमत: सभा झाली. त्यानंतर युती, आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा सुरू झाल्या. लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापत आहे. जिल्ह्यात युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव आणि आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यामध्ये खर्या अर्थाने काट्याची टक्कर असून वंचित बहुजन आघाडीही कोठपर्यंत मजल मारणार हे निकालच स्पष्ट करणार आहे. मात्र बुलडाणा जिल्ह्यातील १७ व्या लोकसभेची ही निवडणूक एक ऐतिहासिक निवडणूक ठरणार आहे. या निवडणुकीद्वारे बुलडाणा जिल्ह्याच्या राजकारणाची आगामी काळाती नेमकी दिशा काय राहील हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक युती व आघाडीच्या उमेदवारांनी प्रतिष्ठेची केली आहे. आता पर्यंत बुलडाणा जिल्ह्यात मेहकर येथे सहकार राज्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील, शिवसेना नेते नितीन बानगुडे यांच्या सभांपाठोपाठ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खामगावात जंगी सभा झाली आहे.दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री फौजिया खान यांची सभा झाली. आता माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची जळगा जामोद येथे शनिवारी सभा झाली तर सोमवारी शरद पवार बुलडाण्यात सभा घेणार आहे. त्यामुळे जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापणार आहे.
बड्या नेत्यांच्या सभांचा पॅटर्नबुलडाणा लोकसभा मतदार संघातील निवडणुकीमध्ये आजपर्यंत प्रचाराच्या दुसर्या टप्प्यात शेवटी बड्या स्टार प्रचारकांच्या सभा घेण्याचा पायंडा आहे. शिवसेनेच्या या पॅटर्नमध्ये आतापर्यंत त्यात बदल झालेला नाही. यंदाही त्याच पॅटर्ननुसार सभा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रसेने त्याच पद्धतीने पावले टाकली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रचाराच्या महत्त्वाच्या आणि निर्णायक क्षणी बुलडाण्यात सभा ठेवली आहे. निवडणुक लढण्याच्या पद्धतीचा दोन्ही उमेदवारांचा पॅटर्नही गत काळाप्रमाणेच आहे.
दोन्ही सभा ठरणार निर्णायकलोकसभा निवडणुकीचा प्रचार १६ एप्रिल रोजी संपणार आहे. त्यामुळे १६ एप्रिलच्या पूर्वसंध्येला निर्णायक क्षणी बुलडाण्यात शरद पवार यांच्या सभेद्वारे आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे हे मतदारांना साद घालणार आहेत. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेच्या उमेदवारासाठी चिखलीमध्ये १५ एप्रिल रोजी सभा घेत आहेत. जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी असलेले चिखली शहर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे शिवसेनेने येथे खासकरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा घेण्याची भूमिका घेतली आहे. या सभेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षातील शिवसेना-भाजपमधील ‘तु-तु-मै-मै’ मुळे कलुशीत झालेले वातावरण निवळून पूर्ववत सलोख्याचे वातावरण निर्माण होऊन लोकसभा निवडणुकीत त्याचा लाभ मिळावा, हा दृष्टीकोण मुख्यमंत्र्यांची सभा चिखलीत घेण्यामागे युतीची भूमिका आहे.