- योगेश फरपट
खामगाव : आट्यापाट्या हा खेळ भारतातील पुरातन, देशी तसेच कमी खर्चिक खेळ असून इंटरनॅशनल चॅम्पयनशिप मध्ये आतापर्यंत भारताला चार वेळा सुवर्णपदक मिळालेले आहे. आट्यापाट्या या खेळामुळे सर्व गुण विकासीत होवून सशक्त खेळाडू तयार होतो, असे आॅल इंडिया आट्यापाट्या फेडरेशनचे सेक्रेटरी डॉ. दीपक कविश्वर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले .
प्रश्न : आट्या पाट्या या खेळाबद्दल काय सांगू शकाल ? आट्यापाट्या हा पुरातन काळी पाण्याच्या पाट्या आखून मैदान तयार करून चंद्रप्रकाशात खेळला जात होता. सन १९८१ साली तत्कालीन खासदार श्री.वा.धाबे यांनी खेळाला पुनरुज्जीवीत केले. पहिली राष्ट्रीय स्पर्धा नागपूर येथे झाली. तेव्हा ७ राज्य होती. त्यानंतर आट्यापाट्या खेळाचा विकास होत गेला. आज २५ राज्यात तर महाराष्ट्रातील २८ जिल्हयात हा खेळ खेळला जातो. केंद्रीय क्रिडा मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली तसेच महाराष्ट्रात राज्य सरकारची या खेळाला मान्यता आहे. याशिवाय महाराष्ट्र आॅलिम्पीकची मान्यता आहे.
प्रश्न : आट्या पाट्या या खेळाला आजही का महत्व आहे. आट्यापाट्या हा खेळ भारतातील ग्रामिण व शहरी क्षेत्रात लोकप्रिय खेळ आहे. महाराष्ट्रात शालेय व महाविद्यालयीन स्तरावर पोषक वातावरण निर्मिती करण्यासाठी व आट्यापाट्या खेळाचा परिचय करण्यासाठी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू महाराष्ट्रातून निर्माण व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
प्रश्न : आट्यापाट्या हा खेळ लोकापर्यत का पोहचू शकला नाही ़?आट्यापाट्या या खेळाबाबत लोकामध्ये जागरुकता नाही. त्यामुळे या खेळासाठी स्पॉन्सरशीप मिळत नाही ही खंत आहे. वास्तविक या खेळामुळे खेळाडूंची शारिरीक क्षमता मजबूत होवून सशक्त खेळाडू तयार होतो. त्याच्यामध्ये सहनशीलतेसह सर्व गुण विकसीत होण्यास मदत होते. त्यामुळे या खेळाला पुढे आणण्यासाठी लोकांनी पुढे आले पाहिजे. प्रसिद्धी माध्यमांनी देखील या खेळाच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे असे वाटते.
प्रश्न : खेळाडूंना आरक्षण आहे काय ?खो-खो, कबडड्ी या खेळाप्रमाणे आटयापाट्या देशी खेळ असून पूर्वी खो खो कबड्डीप्रमाणे या खेळाला पाच टक्के आरक्षण होते. परंतू २०१६ मध्ये सरकारने पाच टक्के आरक्षण बंद केले. त्यानंतर आॅल इंडिया आट्यापाट्या फेडरेशनचे वतीने राज्य व केंद्र सरकार यांच्याकडे खेळाडूंना पाच टक्के आरक्षण देण्यात यावे यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
प्रश्न : सरकारकडून काय अपेक्षा आहे? आट्या पाट्या या खेळाचा शालेयस्तरावर समावेश झाला आहे. त्याचप्रमाणे शालेय स्तरावर आट्यापाट्या स्पर्धा सर्वत्रच संपन्न होत आहे. सरकारकडून आट्यापाट्या खेळांडूसाठी शिवछत्रतपी पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत २५ खेळाडू व संघटनकांना शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झालेला आहे. असे असतांना सर्व खेळांना आरक्षण आहे. मग या खेळाला आरक्षण का नाही असा प्रश्न आहे. शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून खेळांडूंना आरक्षण देण्याची गरज आहे.