लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: एकीकडे जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा दहा हजारांच्या टप्प्यात पोहोचला असतानाच जिल्ह्यात आतापर्यंत सारीचे १,१८९ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी तब्बल ७० टक्के रुग्ण हे तपासणीत कोरोना बाधीत आढळून आल्याचे समोर आले आहे.त्यामुळे सारी अर्थात सिव्हीयर ॲक्युट रेस्पीरेटरी इनफ्केशन असलेल्या रुग्णांचाही शोध आरोग्य विभागाकडून प्राधान्याने घेण्यात येत आहे.आरोग्य विभागाकडून नियमीतपणे सारीच्या रुग्णांचा सर्व्हेक्षणादरम्यान शोध घेण्यात येत आहे. कोरोना संसर्गाच्यी जिल्ह्यात व्याप्ती वाढत असतानाच सारीचेही रुग्ण कोरोना बाधीत निघत असल्याने आरोग्य विभागासमोर आव्हान उभे ठाकले होते. दरम्यान ३१ ऑक्टोबर रोजीच्या बुलडाणा जिल्ह्याच्या अहवालानुसार जिल्ह्यात सारीचे १,१८९ रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले होते. यामध्ये अलिकडील काळात सरासरी सात रुग्ण हे सारीचे आढळून येत असल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सारी आणि आयएलएम ( इन्फ्युएनजा लाइक इन्फेक्शन) या दोन आजाराचे तब्बल १,५८९ रुग्ण आढळून आले होते. दरम्यान या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात ५६ हजार व्यक्तींना दुर्धर आजार असल्याचेही स्पष्ट झाले होते. सारी या आजारात दिसणारी लक्षणे आणि कोरोना संसर्गाच्या संदर्भाने दिसणारी लक्षणे जवळपास सारखीच आहेत. कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढत असताना जिल्ह्यात सारीचेही रुग्ण सापडत असल्याने आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला आहे. सारीच्या आजारामुळे बुलडाणा जिल्ह्यात जवळपास ७९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या आजारावरही आरोग्य विभाग लक्ष केंद्रीत करत आहे.
‘सारी’च्या रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण कोरोनाबाधीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2020 11:52 AM