लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतंर्गत एक हजार पेक्षा जास्त आजारांवर शस्त्रक्रिया व मोफत उपचार करण्यात येतात. कुणीही पात्र रूग्ण पैशांअभावी उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेतंर्गत मोफत उपचाराचा लाभ देण्यात येत आहे. जिल्ह्यात योजनेसाठी दोन लाख ७६ हजार ७०४ कुटूंबे पात्र आहेत. ज्या पात्र कुटूंबांना पंतप्रधान यांच्या स्वाक्षरीचे पत्र प्राप्त झाले आहे; अशा सर्व कुटूंबांचे ई-सेवा केंद्रावर पत्र देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पुर्णपणे निशु:ल्क असून प्रति कुटूंब प्रति वर्ष पाच लाखाच्या रकमेचे मोफत उपचार करण्यात येतात. सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रीयांचा या मध्ये समावेश आहे. लहान मुलांचा कर्करोग, मानसिक आजारावरील उपचारांचाही समावेश यामध्ये आहे. ज्या कुटूंबाचा समावेश लाभर्थ्यांच्या यादीत आहे, त्यांना संगणक प्रणालीद्वारे कुटूंब सदस्या ई कार्ड मिळण्याची तरतूद आहे. योजनेत १ हजार ३०० आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रीया करण्यात येतात. योजने अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणासह बुलडाण्यातील इतर दोन रुग्णालयांचा समावेश आहे. तसेच सामान्य रूग्णालय खामगांव, शेगांव, मलकापुर, मेहकर, चिखली येथील रुग्णालयात उपचार देण्यात येतात.
बुलडाणा जिल्ह्यात आरोग्य योजनेसाठी पावने तीन लाख कुटूंब पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 1:48 PM