खामगाव: गतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या नराधमास आरोप सिध्द झाल्याने २० वर्ष सश्रम कारावास आणि दहा हजाराच्या दडांची शिक्षा सुनावली. खामगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश पी.पी.कुळकर्णी यांनी गुरूवारी हा महत्वपूर्ण निकाल दिला. संग्रामपूर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन व गतिमंद असलेल्या पिडीतेवर २७ वर्षीय राम भारत पालकर याने ९ नाव्हेंबर २०१८ रोजी अत्याचार केल्याची घटना घडली.
याप्रकरणी तिच्या मोठ्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलीसांनी दोषाराेपत्र खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने १२ साक्षीदार तपासले. यात गंतिमंद पिडीता, तिची आई, वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी ढाकणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत टिपले, डॉ. संजय काकडे, डॉ. चैतन्य कुळकर्णी, डॉ. अजय बिहाडे व तपास अधिकारी डी.बी. वाघमोडे यांची साक्ष महत्वाची ठरली. आरोप सिध्द झाल्याने नराधमास भादंवि कलम ४५२ प्रमाणे ७ वर्ष सश्रम कारावास, पाच हजार रूपये दंड व दंड न भरल्यास ४ महिन्यांचा सश्रम कारावास तर भादंवि कलम ३७६(२)(जे)(एल)प्रमाणे १० वर्ष सश्रम कारावास, दहा हजार रूपये दंड व दंड न भरल्यास १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. त्याचप्रमाणे बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ च्या कलम (२) अन्वये २० वर्ष सश्रम कारावास, दहा हजार रूपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच पिडीता व तिच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई व पुर्नवसन निधी अदा करण्यासाठी विधी सेवा समितीकडे देखील शिफारस केली. या प्रकरणी सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त शासकीय अभियोक्ता रजनी डी.बावस्कार यांनी बाजू मांडली. तर कोर्ट पैरवी पोहेकॉ प्रकाश इंगळे यांनी केली.