राजपूत समाज मेळा बुलडाणा : राजपूत समाजाचा गौरवशाली इतिहास राहिलेला आहे. वर्तमानात या समाजापुढे आर्थिक मागासलेपण दूर करण्यासोबतच इतर अनेक समस्या आहेत. मात्र विपरीत परिस्थीतीतही शैक्षणिक शिखरे गाठत असलेल्या या समाजाने वाईट चालीरीती त्यागण्याची गरज निर्माण झाली असून हुंड्यासारखी कुप्रथाही समाजाने मोडीत काढायला हवी, असे आवाहन पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री ना. जयकुमार रावळ यांनी येथे केले. बुलडाणा जिल्हा राजपूत सेवा समिती व राजपूत भामटा कास्ट्रॉईब असोसिएशन बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील राणा गेस्ट हाऊसमध्ये दोन नोव्हेंबरला सकाळी १० वाजे दरम्यान ना. रावळ यांच्या छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रक्ताच्या नातेवाईकांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी अडवू नये, असा निर्णय नुकताच मंत्रीमंडळाने घेण्यामध्ये पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर आणि ना. जयकुमार रावळ यांची भूमिका महत्वपूर्ण ठरली होती. याबद्दल कृतज्ञता म्हणून बुलडाणा दोर्यावर आलेल्या ना. रावळ यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ना. रावळ पुढे म्हणाले की, देशाची सार्वभौमता अबाधित राखण्यासाठी केवळ राजपूत वीरांनीच नव्हे तर राजपूत स्त्रीयांनीही बलिदान केलेले आहे. मात्र हा समाज आज आर्थिकदृष्ट्या खचलेला आहे. त्याला नवी उभारी देण्यासाठी शासन या समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील. जात वैधता प्रमाणपत्रामधील अडचणी दूर करण्यासाठी भाजपा सरकारने रक्ताच्या नातेवाईकाबाबत घेतलेला निर्णय महत्वाचे पाऊल आहे. इतरही समस्या दूर करण्यासाठी शासनाचा प्रतिनिधी या नात्याने आपण कटीबद्ध राहू, असे आश्वासन त्यांनी दिले.याप्रसंगी मंचावर शिवसेनेचे आ. डॉ. संजय रायमूलकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंग राजपूत, शिक्षक संघटनेचे वसंतराव गाडेकर, इंजी. रविंद्रसिंग राजपूत, ज्येष्ठ नेते डॉ. जे.बी. राजपूत, मधुसूदन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे बहारदार संचलन प्रा. गोपालसिंग राजपूत यांनी केले. प्रास्ताविकपर मनोगतात डॉ. यु.बी. राजपूत यांनी रावळ समाजाचे बलस्थान असल्याचे सांगितले. तर गाडेकर यांनी जात वैधता प्रमाणपत्राबाबतच्या निर्णयाचे स्वागत करीत यात ना. फुंडकर आणि ना. रावळ यांनी निभावलेल्या भूमिकेबद्दल समाजाच्या वतीने आभार मानले. आभार गजानन इंगळे यांनी केले. डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी समाजाने संगठीत होण्याची गरज व्यक्त केली. समाजातील अनेक प्रतिष्ठीतांनी यावेळी ना. रावळ यांचा सस्नेह सत्कार केला. राजपूत सेवा समितीच्या वतीने स्मरणीका रावळ यांना भेट देण्यात आली. याप्रसंगी भगवानसिंग राजपूत, एम.डी. जाधव, जयसिंग चव्हाण, गोपालसिंग राजपूत सागवन, रणजीतसिंग राजपूत, प्रतापसिंग राजपूत, ओमसिंग राजपूत, अजयसिंग राजपूत, सुनिल सोळंकी, गणेश जाधव, नंदु राजपूत, पृथ्वीराज राजपूत, सुधाकर जाधव, दारासिंग पवार, अनिल जगताप, डॉ. साहेबराव सोळंकी, गजेंद्रसिंग राजपूत, जीवनसिंग राजपूत, विजयसिंग राजपूत, सुनिल देवरे, ए.डी. ठेंग, गजाननसिंग मोरे, उद्धव ठेंग, गजानन जाधव, विजयसिंग इंगळे, संजय जाधव तसेच अनेक मान्यवर कार्यक्रमात सहभागी होते.
‘शैक्षणिक प्रगती साधून कुप्रथांचा त्याग करावा - जयकुमार रावळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 2:12 PM
हुंड्यासारखी कुप्रथाही समाजाने मोडीत काढायला हवी, असे आवाहन पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री ना. जयकुमार रावळ यांनी येथे केले.
ठळक मुद्देबुलडाणा येथे राजपूत समाज मेळाव्यात आवाहन