फहीम देशमुख / शेगाव तंत्रशिक्षण संचालनालय (डीटीई) व अमरावती विद्यापीठातील समन्वयाच्या अभावाचा फटका मास्टर आॅफ कॉम्प्युटर अॅप्लीकेशन (एमसीए)च्या व्दितीय वर्षातील विद्यार्थ्यांना बसल्यामुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे. थेट व्दितीय वर्षासाठी अर्ज स्वीकारण्यास विद्यापीठाने नकार दिल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. एमसीए हा पदव्युत्तर अभ्यासक्रम तीन वर्षांचा असून या अभ्यासक्रमासाठी बीसीए, बीएस्सी, कॉम्प्युटर सायन्स आदी संगणक अभ्यासक्रमाशी संबंधित पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना एमसीच्या प्रवेश परीक्षेनंतर यापूर्वी थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेता येत होता. मात्र आता विद्यापीठाने एमसीए अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश न देण्याचे धोरण आखले आहे. एमसीए अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना प्रथम वर्षापासून म्हणजेच तीन वर्षे पूर्ण करावा लागणार आहे. यासाठी बीसीए, बीएस्सी, कॉम्प्युटर सायन्स आदी संगणक अभ्यासक्रमाशी संबंधित पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना एमसीए च्या प्रथम वर्षाचा किमान ७५ हजार रुपये अतिरिक्त खर्च याशिवाय एक वर्ष अतिरिक्त द्यावे लागणार आहे. विदर्भात एमसीएचे एकूण २५ कॉलेजेस असून यामध्ये सुमारे १७५० विद्यार्थी शिक्षण घेतात. तर बीसीए, बीएस्सी, कॉम्प्युटर सायन्स आदी संगणक अभ्यासक्रमाशी संबंधित पदवी घेतलेले विद्यार्थी जे एमसीएच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेऊ इच्छितात अशांची संख्या ६५० च्या जवळपास आहे. यासाठी विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षात प्रवेश द्यावा असे साकडे पश्चिम विदर्भातील विद्यार्थी शृंग पाठक, शुभम श्रीनाथ, तृप्ती देशमुख, वैष्णवी देशमुख, स्नेहा विंचू, भाग्यश्री गेडाम आदी विद्यार्थ्यांनी घातले आहे. विद्यापिठाने यावर तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.