लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जागतिक आश्चर्य असलेल्या लोणार सरोवरातील जैवविविधतेला सरोवरात अवाजवी स्तरावर वाढलेल्या वेड्या बाभळीचा मोठा धोका असून, त्या पार्श्वभूमीवर या वेड्या बाभळीच्या निर्मूलनासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न होण्याची गरज ओळखून, लोणार सरोवर विकास आराखड्यांतर्गत ३.६३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लोणार दौऱ्यानंतर या कामास वेग मिळाला आहे. लोणार सरोवर परिसरता पक्षांच्या १६० प्रजाती, ४६ सरपटणारे प्राणी आणि १२ अन्य प्राण्यांच्या प्रजाती राहतात. त्यामुळे येथे जैवविविधतेची मोठी भरमार आहे. मात्र, त्यास अस्ताव्यस्तपणे वाढलेल्या वेड्या बाभळीचा फटका बसत आहे. त्यामुळे तिच्या निर्मूलनासाठी व्यापक स्तरावर माेहीम हाती घेण्याची गरज आहे. मात्र, ते करताना सरोवराच्या जैवविविधतेस धोका निर्माण होणार नाही, याची काळजीही घ्यावी लागणार आहे.नागपूर खंडपीठात लोणार सरोवर क्षती प्रतिबंध व संवर्धनाच्या दृष्टीने दाखल याचिकेमध्येही हा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने २२ फेब्रुवारी रोजी नागपूर खंडपीठाच्या दोन न्यायमूर्तींनी प्रत्यक्ष लोणार येथे भेट देऊन सरोवर संवर्धनाच्या दृष्टीने काय उपाययोजना करण्यात आल्या, याची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळी वेड्या बाभळीचाही मुद्दा उपस्थित झाला होता. तेव्हा ६० हेक्टरपैकी ६.६८ हेक्टरवरील वेडी बाभूळ काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते, तेव्हा वेडी बाभूळ काढण्यासाठी हॅन्डपिकिंग मशिनचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सातपुडा फाउंडेशनच्या सहकार्याने वेडी बाभूळ निर्मूलनाचे काम त्यावेळी झाले होते.दरम्यान, त्यानंतरही ५४ हेक्टरवरील वेडी बाभूळ काढण्याचे आव्हान वन्यजीव विभागासमोर उभे ठाकलेले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या लोणार दौऱ्यानंतर लोणार विकास आराखड्यास चालना मिळाली आहे. येथील विकास कामासाठी आगामी वर्षभरात १०७ कोटी रुपये उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यात वेड्या बाभळीच्या निर्मूलनासाठी ३.६३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या संदर्भात लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊन वेडी बाभूळ काढण्यास प्रारंभ करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
लोणार सरोवरातील वेडी बाभूळ निर्मूलनाच्या हालचालींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 12:26 PM