बुलडाणा - मेहकर विधानसभेचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्या वाहनाला वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनाने जबर धडक दिल्याने आ. रायमुलकर यांच्यासह त्यांच्या वाहनाचा चालक, सुरक्षा रक्षक असे तिघेही जखमी झाले आहे. दरम्यान, तिघांनाही उपचारासाठी रात्री औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात आज जानेफळ- मेहकर मार्गावर रात्री साडेनऊच्या सुमारास घडला.
जानेफळ येथून संजय रायमुलकर हे आपल्या वाहनाद्वारे (एमएच-२८- ऐझेड-७७७१) मेहकर येथे जात असताना त्यांच्या वाहनाला समोरून येणाऱ्या व वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनाने (एनएच-२८-९८०१) जबर धडक दिली. नायगाव दत्तापूर- भालेगाव दरम्यान हा अपघात झाला. हा अपघात एवढा जबरदस्त होता की रायुलकर यांची गाडी ही रस्त्या लगतच्या नाल्यात पडून उलटी झाली तर वाळूची वाहतूक करणारे वाहन हे रस्त्यावरच उलटे झाले. या अपघातामध्ये संजय रायमुलकर यांच्यासह चालक पंजाब गुडदे आणि अंगरक्षक ज्ञानेश्वर निकस हे तिघेही जखमी झाले आहेत. ग्रामस्थांनी त्यांना तातडीने मेहकर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथून त्यांना तातडीने औरंगाबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अपघातचे वृत्त कळताच युवा सेनाप्रमुख ऋषीकेश जाधव, माधवराव जाधव, बबनराव तुपे, समाधान साबळे, सचिन जाधव, अशिष रहाटे यांनी स्थानिक रुग्णालय गाठून त्यांची विचारपूस करत त्वरित औरंगाबाद येते हलविले. दरम्यान तिघांना काही प्रमाणात मार लागला असला तरी तो गंभीर स्वरुपाचा नसल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.