भगवान वानखेडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, बुलढाणा : हायस्पीड समृद्धी महामार्ग हा वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनत आहे. लोकार्पण झाल्यापासून या महामार्गावर आतापर्यंत ५३ अपघात झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. अपघाताची ही मालिका रोखण्यासाठी समृद्धीवर योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.
जिल्ह्यातून जाणाऱ्या हायस्पीड समृद्धी महामार्गाची लांबी ८५ किलोमीटर असून, मेहकर ते सिंदखेड राजा दरम्यान या महामार्गावर तीन इंटरचेंज टाकण्यात आले आहेत. हा महामार्ग वाहतुकीसाठी ११ डिसेंबर रोजी खुला करण्यात आला होता. तेव्हापासून या महामार्गावर लहान मोठे असे ५३ पेक्षा अधिक अपघात झाले आहेत. या महामार्गावर वाहनांना देण्यात आलेली वेगमर्यादा ही कारसाठी १२० तर अवजड वाहनांसाठी ८० ठरविण्यात आली आहे. मात्र, हा मार्ग वाहनधारकांसाठी नवीन असल्याने अतिवेगाने वाहने चालविणे वाहनधारकांसाठी घातक ठरत आहे.
‘क्यूआरव्ही’कडे तीन महिन्यांत ७३ कॉल
समृद्धी महामार्गावर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी क्वीक रिस्पॉन्स व्हेईकल अर्थात ‘क्यूआरव्ही’ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.या यंत्रणेकडून ८१८१८१८१५५ या टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांत यंत्रणेकडे महामार्गावरील अपघातांचे ७३ कॉल आले आहेत. हे सर्व कॉल एकट्या मेहकर इंटरचेंज हद्दीतील आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातून ८५ किलोमीटर समृद्धी महामार्ग गेलेला आहे. तीन ठिकाणी इंटरचेंज आहेत.तीन रेस्क्यू टीमकडे एकूण ४५ कर्मचाऱ्यांचा ताफा आहे.त्यामध्ये एक अधिकारी, १४ कर्मचारी आणि एक वाहन असे प्रत्येकी इंटरचेंजवर कार्यान्वित करण्यात आलेले आहे.महामार्गातील नागपूर ते शिर्डीपर्यंत एकूण १५ ठिकाणी ही यंत्रणा उपलब्ध आहे.
१२ दिवसांत आरटीओने अशी केली कारवाई
समृद्धी महामार्गावर वाहतूक नियमांचे पालन करून घेण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई केली जात आहे. मागील १२ दिवसांत आरटीओ विभागाने लेन कटिंग करणाऱ्या २५, नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणाऱ्या ४, रिफ्लेक्टर नसणाऱ्या २, तर नंबर प्लेट नसणाऱ्या २ वाहनांवर कारवाई केली आहे.
‘समृद्धी’वर वाहनधारकांनी वाहन नियंत्रित करता येईल, तेवढ्याच वेगाने वाहने चालविली पाहिजेत. तेव्हाच अपघात टाळता येऊ शकतात. - प्रसाद गाजरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बुलढाणा.
समृद्धीवर आतापर्यंत अपघातवर्ष अपघात प्राणांतिक२०२२ १९ ०१२०२३ ३४ ०४
आतापर्यंत झालेले मृत्यू १०
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"