मेहकर : मेहकर मतदारसंघाचे आमदार तथा पंचायतराज समिती अध्यक्ष संजय रायमुलकर यांच्या गाडीचा ९ जानेवारी राेजी १२च्या दरम्यान जालना येथे अपघात झाला. यामध्ये रायमुलकर यांच्या मुलासह पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत.
आमदार संजय रायमुलकर यांचा मुलगा नीरज संजय रायमुलकर व त्याचे मित्र ९ जानेवारीला औरंगाबाद गेले होते. तेथून परत येत असताना जालना शहरातील कन्हैयानगर ते बीड बायपास रस्त्यावर कारचे (क्र. एमएच २८ बीके २७७७) अचानक टायर फुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या खाली उतरून उलटली. या अपघातात नीरज संजय रायमुलकर, वरद ठाकूर, ऋषी पागोरे, प्रतीक इंगळे व सुनील पंडारे किरकोळ जखमी झाले. नीरज रायमुलकर हे स्वतः वाहन चालवत होते. सुदैवाने आमदार संजय रायमुलकर मेहकर येथे होते. एक वर्षापूर्वी याच तारखेला मेहकर जानेफळ रस्त्यावर आमदार संजय रायमुलकर यांच्या गाडीचा अपघात होऊन त्यात आ.संजय रायमुलकर यांना दुखापत झाली होती.