डोणगाव (जि. बुलढाणा) - वडिलांचे पार्थिव रुग्णवाहिकेद्वारे बिहारमधील आपल्या मूळ गावी बक्सर येथे घेऊन जाणाऱ्या मुलाच्या कारला डोणगाव नजीक अपघात होऊन कारमधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान गंभीर जखमी झालेल्या चारही जणांवर डोणगाव येथील खासगी रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना तातडीने जालना येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्यांमध्ये राम वर्मा, गायत्रीदेवी वर्मा, अमितादेवी वर्मा, अनितादेवी वर्मा या चार जणांचा समावेश आहे.
राम वर्मा हे पुणे येथील एका कंपनीत कामाला आहेत. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांचे पार्थिव एका रुग्णवाहिकेद्वारे घेऊन ते बिहार राज्यातील बक्सर येथे आपल्या मूळ गावी घेऊन जात होते. पार्थिव ठेवलेली रुग्णवाहिका समोर व त्याच्या पाठिमागे कारद्वारे हे वर्मा कुटूंब जात होते. दरम्यान बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातच्या सीमावर्ती भागात असलेल्या व मेहकर तालुक्यातील डोणगाव लगतच असलेल्या पिंप्री सरहद गावानजीक एमएच ४६-बीएम-६५७५ क्रमांकाच्या मेहकरकडे जाणाऱ्या जड वाहतूक करणाऱ्या वाहनाची व वर्मा यांच्या कारची (एमएच-१२-एमबी-३८२२) समोरासमोर जबर धडक झाली. पिंप्री सरहद गावाजवळ प्रकाश गाभणे यांच्या शेताजवळ हा भीषण अपघात झाला. त्यात कारमधील राम वर्मा, गायत्रीदेवी वर्मा, अमितादेवी वर्मा, अनितादेवी वर्मा हे चौघेही जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर डोणगाव येथे प्रथमोपचार करून तातडीने जालना येथे हलविण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच डोणगाव पोलीस ठाण्याचे विकास राऊत, पवन गाभणे, ठाकरे, गरड यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने डोणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले. दरम्यान महामार्ग पोलिसांचे वाशिम येथील पोलिस निरीक्षक नारमोडे, सतीष गुडधे, पोलिस कॉन्स्टेबल प्रदीप जाधव, रामदास यशवंते, गणेश गावंडे यांनीही त्वरित घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी डोणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. जड वाहतूक करणाऱ्या वाहनाचा (ट्रेलर) चालक अपघातानंतर वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे पसार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग पोलिसांचे पथक त्याच्या शोधात गेले आहे. दुसरीकडे रुग्णवाहिकेचा चालक व त्याच्यासाबेत असलेला अन्य एक व्यक्ती सध्या भेदरलेल्या अवस्थेत असून त्यांनाही फारसी माहिती देता येत नसल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.