संग्रामपूर ( बुलढाणा): वरवट बकाल मार्गावर बावनबीरलगत टुनकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या अपूर्ण रपट्यामध्ये पडून दि. ३ सप्टेंबर रोजी पोलीस कर्मचाऱ्याचा नाहक बळी गेला. याप्रकरणी सोनाळा पोलिसांनी तपासाच्या एक महिनानंतर रपट्याचे काम करणारा अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील वारखेड येथील ठेकेदार साहेबराव वानखडे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
सोनाळा-टुनकीकडे जाणाऱ्या कैची वळण मार्गावर अर्धवट रपटा बांधण्यात आला. त्या रपट्याच्या १० फुट खोल खड्ड्यात पडून तामगाव पोलीस स्टेशनला कार्यरत पोलीस अंमलदार संतोष राजपूत यांचा मृत्यू झाला होता. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या लगत भराव, कुंपण, सूचना फलक तसेच पुलाचा भाग बंद न केल्याने त्यांचा जीव गेला. दरम्यान, सोनाळा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिसांनी सखोल तपास करीत दि. ३ ऑक्टोबर रोजी या रपट्याचे काम करणारा आरोपी कंत्राटदार साहेबराव दादाराव वानखडे याच्यावर गुन्हा केला. आरोपी ठेकेदाराने दि. २० मे २०२१ पासून पुलाचे बांधकाम सुरू केले. मात्र सार्वजनिक रहदारी व सुरक्षेच्या दृष्टीने वळण मार्गावर काम सुरू असल्याचे सूचना फलक, बॅरिकेड, रस्ता दिशादर्शक फलक जाणीवपूर्वक लावले नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. जाणीवपूर्वक निष्काळजीपणा पोलीस कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतल्याचा ठपका ठेवत सरकारतर्फे ना. पो. का. विशाल गवई यांच्या फिर्यादीवरून आरोपीवर कलम ३०४ (अ) भादवि सह कलम १९८ (अ) मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पुढील तपास विशाल गवई करीत आहेत.
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शासनाच्या निर्देशानुसार सूचना फलक, बॅरिकेड, रस्ता दिशादर्शक फलकासह इतर उपाययोजना न केल्यास अपघातात एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो. तरीही ठेकेदाराने निष्काळजीपणा केल्याचे तपासात निष्पन्न झाले.- श्रीधर गुट्टे,ठाणेदार
पोलीस स्टेशन सोनाळा