योगेश देऊळकार, मलकापूर : येथील ठेवीदारांची सहा कोटींनी फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी उन्नती महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या लेखापालास अटक केली. त्याला पाच दिवसांच्या पोलिस कोठडीचे आदेश न्यायालयाने मंगळवारी दिले आहेत.
उन्नती महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मलकापूर या संस्थेत ६ कोटी ३१ लाख ८२ हजार १५२ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार ठेवीदार वैभव गणेश पाटील यांनी केली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी पतसंस्थेच्या महिला अध्यक्षांसह १३ संचालक व लेखापालाविरुध्द १३ जुलै रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणी तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आला होता. त्यांनी १६ जानेवारी रोजी उन्नती महिला बँक व्यवस्थापक राजेश वसंत चव्हाण याला अटक केली. दोन वेळा पोलिस कोठडीत राहिल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दुसरीकडे एकच तक्रार झाली असली तरी फसवणूक झालेल्या ठेवीदारांची संख्या सुमार असल्याने त्यांच्यात असंतोष खदखदत आहे.
अशातच पोलिस अधीक्षक सुनील कडासणे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, हवालदार संजय शेळके, राम पवार, नीलेश वाघमारे, भारतसिंह राजपूत, शरद डोईफोडे आदींच्या पथकाने उन्नती महिला बँक लेखापाल रमेश प्रल्हाद तांदुळे याला सोमवारी रात्री मलकापुरात अटक केली. त्याला पाच दिवसांच्या पोलिस कोठडीचे आदेश न्यायालयाने मंगळवारी दिले आहेत. या प्रकरणी पोलिस कोठडीत आरोपींकडून गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता आहे.