चिखली पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा मे, २०१९ मध्ये दाखल करण्यात आला होता. चिखली शहरात बाजार समितीजवळून दुचाकीवर जात असताना कोलारा येथील श्रीकृष्ण मधुकर सोळंकी (२९) यांना अचानक एका व्यक्तीने थांबवून तंबाखूबाबत विचारणा केली होती. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आणखी दोघे जण आले होते. दुचाकीस कट का मारला, अशी विचारणा करून सोळंकी यांच्या खिशातून रोख पाच हजार रुपये आरोपींनी काढून घेतले होते. प्रकरणी श्रीकृष्ण सोळंकी यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर आरोपी फरार होता. मात्र, तो चिखली शहरात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली असता, त्यांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेत, चिखली पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्या विरोधात चोरी, घरफोडी, जबरी चोरी असे काही गुन्हे दाखल आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके, नायक पोलीस कॉन्स्टेबल दीपक पवार, गजानन चतूर, विजय सोनोने, नदीम शेख यांनी ही कारवाई केली.