पीडित युवती ही प्रदीर्घ कालावधीपासून सुलतानपूर परिसरातील एका रुग्णालयामध्ये काम करते. २१ ऑगस्टला रात्र पाळीसाठी पीडित युवती जात असताना दुचाकीवर रुग्णालयात नेऊन सोडतो असे सांगत शेख सोहील शेख इसाक याने या युवतीचा विनयभंग केला. यासंदर्भाने घडलेल्या घटनेच्या आधारावर पीडित युवतीने मेहकर पोलिस ठाण्यात शेख सोहील विरोधात तक्रार दिली. सोबतच गेल्या काही महिन्यापासून संबंधित युवक दुचाकीवरून आपला पाठलाग करत असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. भीतीपोटी ही बाब आपण कोणाला सांगितली नाही, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपी शेख सोहेल विरोधात विनयभंगासह ॲट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत त्यास २२ ऑगस्ट रोजी अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आत्माराम प्रधान, पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रभाकर सानप, राजेश जाधव, निवृत्ती सानप हे करीत आहे.
--सोहीललाही मारहाण--
दरम्यान २१ ऑगस्ट रोजी घडलेल्या विनयभंगाच्या घटनेनंतर काही कालावधीने शेख सोहील यास शुभम पाटोळे नामक युवकानेही मारहाण केली होती. त्यासंदर्भातील तक्रारही शेख सोहील याने नंतर मेहकर पोलिसात दिली. त्यावरून शुभम पाटोळे विरोधात शेख सोहील यास मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनयभंग प्रकरणात पीडित मुलीने २१ ऑगस्ट रोजी रात्री पोलिसात तक्रार दिली होती तर मारहाण प्रकरणी शेख सोहिल यानेही रात्रीच पोलिसात तक्रार दिली होती. दोन्ही तक्रारीवरून २२ ऑगस्ट रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.