तात्पुरत्या कारागृहातून आरोपीने काढला पळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 7:00 PM
Crime News : आरोपीने बुलडाणा येथील तात्पुरत्या कारागृहातून २९ एप्रिल रोजी पहाटे पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे.
बुलडाणा: शेगाव पोलिस ठाण्यातंर्गत दाखल बलात्कार व पोस्को कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीने बुलडाणा येथील तात्पुरत्या कारागृहातून २९ एप्रिल रोजी पहाटे पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान याप्रकरणी सध्या या आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.या घटनेमुळे मात्र प्रशासनात खळबळ उडाली आहे. विनोद श्यामराव वानखेडे (४२) असे आरोपीचे नाव असून तो अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील मांडोली (पो. पान्हेरी) येथील रहिवाशी आहे. आरोपी विनोद शामराव वानखेडे याच्या विरोधात बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात बलात्कार व पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल आहे. आरोपी विनोद वानखेडे हा न्यायालयीन कोठडीत होता. त्याला कोरोना संसर्ग झाल्याच्या पार्श्वभूमीवर बुलडाण्याच्या ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रातील सिंहगड इमारतीत असलेल्या तात्पुरत्या कारागृहात १४ दिवसांसाठी विलगीकरणात ठेवण्यात आले होते. मात्र २९ एप्रिल रोजी पहाटे ५:४५ वाजेच्या सुमारास आरोपी शौचालयास गेला असता त्याने तेथील लोखंडी गज तोडून पलायन केले असल्याची तक्रार प्रभारी कारागृह अधीक्षक भी. ना. राऊत यांच्या तर्फे पोलिस कॉन्स्टेबल किरण माने यांनी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नायक शरद सावळे हे करीत आहेत. दरम्यान गेल्या पाच ते सात दिवसापूर्वी या आरोपीने फिनाईलही प्रशान करण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती आहे. सध्या पोलिस या आरोपीचा शोध घेत आहेत.