मोताळा, दि. ९- मोताळा येथील हाणामारीप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी अटक केलेल्या तीन आरोपींना गुरुवारी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सहा आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील तीन आरोपी अद्याप फरार असून, बुधवारी रात्री आरोपींविरुद्ध ३९५ कलम दाखल केली आहे. मंगळवारी कैलास नंदलाल झंवर रा. मोताळा यांना त्यांच्या स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात सहा आरोपींनी जबर मारहाण केली होती. यावेळी त्या ठिकाणी असलेले संजय पाटील, सुनील कोल्हे यांनाही या सहा जणांनी जबर मारहाण करून ग्राहक सेवा केंद्रातील साहित्याची तोडफोड केली होती. या प्रकरणात आरोपी हिमांशू भिकमचंद झंवर, आकाश मारोती डंबेलकर, अमोल गणेश सपकाळ या तिघांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली होती. गुरुवारी तिघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणात बुधवारी रात्री तपासादरम्यान पोलिसांनी दरोड्याच्या गुन्हय़ाची वाढीव कलम समाविष्ट केली आहे; मात्र तिसर्या दिवशीही तीन आरोपी फरार आहेत.
हाणामारी प्रकरणातील आरोपी न्यायालयीन कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2017 1:49 AM