लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव बढे : मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथे पावसाचे पाणी शेतात काढल्याच्या कारणावरून भाऊबंदकीमध्ये झालेल्या वादात दोघांचा खून झाल्याप्रकरणी अटक चार आरोपींना मोताळा न्यायालयात १३ जून रोजी हजर करण्यात आले होते. दरम्यान, या चारही आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.आरोपीमध्ये उमेश गजानन मोरे त्याचा भाऊ मंगेश मोरे, वडील गजानन मारे व उमेशच्या आईचा समावेश आहे. ही दुहेरी खुनाची घटना १२ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली होती.दुसरीकडे मृत पावलेले त्र्यंबक रामलाल मोरे व सुभाष रामलाल मोरे यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यावर १३ जून रोजी सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.दरम्यान, परिस्थितीचे गांभिर्य पाहता पोलिसांनी सिंदखेड गावामध्ये बंदोबस्त तैनात केला आहे. या प्रकरणात १२ जून रोजी रात्री उशिरा त्र्यंबक मोरे व सुभाष मोरे यांचा शेतीच्या वादातून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.१२ जून रोजी गावात झालेल्या हाणामारी दरम्यान मृत पावलेल्या दोघांच्या सोबत असलेले सुनील सुभाष मोरे आणि अनिल तुळशीराम मोरे हे दोघे जखमी झाले होते. त्यांच्यावर बुलडाणा येथील रुग्णालयात उपचार करण्यात आहे. या दुहेरी खुनाच्या घटनेचे गांभिर्य पाहता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांच्यास पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात दाखल झाला होता. सध्या येथील परिस्थिती शांत आहे. प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना १७ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दोन भावांच्या खून प्रकरणातील आरोपींना पोलिस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 11:08 AM