चिखली (बुलडाणा) : येथील तालुका क्रीडा संकुलामध्ये विजयादशमीच्या रात्री झालेल्या २५ वर्षीय युवकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी अवघ्या २४ तासाच्या आत मुख्य आरोपीसह एका संशयिताला ताब्यात घेतले. यापैकी २0 वर्षीय मुख्य आरोपीने क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणातून हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी आरोपीचे रक्ताने माखलेले कपडे जप्त केले आहेत, अशी माहि ती ठाणेदार विजयसिंग राजपूत यांनी दिली आहे. स्थानिक तालुका क्रीडा संकुलामध्ये ४ ऑक्टोबर रोजी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी मैदानावर जाणार्या नागरिकांना नालीच्या काठावर चेहरा छिन्नविछिन्न केलेल्या अवस्थेमध्ये एका युवकाचा मृ तदेह आढळून आला होता. याबाबत मैदानावरील कामगाराच्या फिर्यादीनंतर या मृतकाची ओळख पटविण्यामध्ये पोलिसांना यश आले आणि हा मृतदेह स्थानिक गोरक्षण वाडी परिसरातील अंकुश लक्ष्मण पंडितकर याचा असल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी श्वानपथकाचीही मदत घेतली होती. दरम्यान, निवडणूक प्रचार सभांचा बंदोबस्त आणि इतर कामा तही पोलिसांनी काही तासांमध्ये संशयित म्हणून शालीकराम तुळशीराम मुखे रा. कुर्हा काकोडा ह.मु. चिखली याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयासमोर उपस्थित करून ८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी मिळवून अधिक तपास केला असता या प्रकरणाचे धागेदोरे जुळवित पोलिसांनी मुख्य आरोपी सागर अंबादास बोरकर रा. संभाजीनगर चिखली याला ताब्यात घेऊन बोलते केले असता त्याने खून केल्याची कबुली दिली आहे. ३ ऑक्टोबरच्या रात्री आरोपी सागर बोरकर हा मृतक अंकुश पंडितकर याच्यासमवेत भरपूर दारू पिल्यानंतर दोघेही घराकडे जाताना तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर काही काळ थांबले याच ठिकाणी दोघांचे क्षुल्लक कारणावरून भांडण झाले, या भांडणाचे पर्यवसान आरोपी सागर बोरकर याने मृतक अंकुशच्या डोक्यामध्ये दगडाचा वार करून त्याचा खून करण्यामध्ये झाले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी दिली.
खूनप्रकरणी आरोपीसह संशयित अटकेत
By admin | Published: October 06, 2014 11:54 PM