मलकापूर (बुलडाणा) : मृतक वृद्ध महिलेच्या फोनवर शेवटचा काँल आरोपी मुलगा भार्गव याने केला. त्याआधारेच पोलिसांनी तपास करत आरोपी बापलेकाच्या मुसक्या आवळल्या. कौटुंबिक कलहातील रागामुळे बापलेकाने नगरपरिषदेमधील सेवानिवृत्त कर्मचारी प्रभा माधव फाळके यांची हत्या केल्याप्रकरणी मुक्ताईनगर येथील न्यायालयाने आरोपी बाप-लेकाला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती मुक्ताईनगरचे ठाणेदार शंकर शेळके यांनी दिली.
मृतक प्रभा माधव फाळके (वय ६३, रा. गणपती नगर, भाग २) ह्या २७ ऑगस्ट रोजी परिसरातच असलेल्या मंदिरामध्ये पूजेची थैली घेऊन दर्शनासाठी जात असल्याचे मुलाला व सुनेला सांगून निघून गेल्या होत्या. त्या परतल्याच नाहीत. मुक्ताईनगर पोलिसांना २९ ऑगस्ट रोजी त्यांचा मृतदेह आढळून आला. आढळलेल्या मृतदेहाबाबत तपास करण्यासाठी मुक्ताईनगर ठाण्याचे पथक मलकापुरात दाखल झाले. मृतक महिलेच्या जवळच्या असलेल्यांनीच त्यांचा खून केल्याचा संशय पोलिसांना होता. महिलेच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन घरापासून जवळचे अंतर दाखवत होते. त्यानंतर मोबाईल बंद पडला होता. त्यामुळे मुक्ताईनगरचे पोलिस निरिक्षक शंकर शेळके यांनी महिलेच्या घराभोवतीच तपास केंद्रीत केला. तसेच त्या महिलेच्या मोबाईलवर शेवटचा काँल आरोपी भार्गव गाढे यानेच केल्याची नोंदही पोलिसांना मिळाली होती. ही सर्व वस्तुस्थिती पाहता पोलिस पथकाने त्या महिलेच्या घराशेजारी वास्तव्यास असलेल्या भार्गव विश्वास गाढे (२१), विश्वास भास्कर गाढे (४५) या दोघा बापलेकांना ताब्यात घेत अटक केली. त्यांना शुक्रवारी मुक्ताईनगर येथील प्रथमश्रेणी न्यायालयासमोर हजर केले. त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी दिल्याचे शेळके यांनी सांगितले.
- मृतक महिलेचा आरोपींच्या घरीच ठिय्या
मृतक महिला सतत आरोपी गाढे यांच्या घरीच असायची. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात वाद होत असल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली. ही बाब शेजारी असलेल्यांनाही माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले. खूनाचे मूळ कारण अद्यापही पुढे आले नाही. पोलिस कोठडीतून ते पुढे येण्याची शक्यता आहे.