- विवेक चांदूरकर
खामगाव : शिक्षकांना गावात राहण्यासाठी जागा नाही, त्यामुळे ते राहत नाहीत. तसेच येण्या-जाण्यासाठी मुबलक साधने नसल्याने नियमित येत नाहीत. याचा परिणाम आपल्या गावातील विद्यार्थ्यांवर होत असल्याने यावर उपाय म्हणून प्रल्हादराव गावंडे यांनी बोथकाजी गावात शिक्षकांसाठी स्वखर्चाने व स्वतच्या जागेत स्वतंत्र क्वार्टर बांधले. यामध्ये शिक्षकांना मोफत राहण्याची व्यवस्था केली.
एकोणविसाव्या शतकात देशामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले. शिक्षणाची गंगा वाहायला लागली होती. मात्र, केवळ मोठ्या शहरांमध्ये शाळा व शिक्षणाच्या सोयी उपलब्ध होत्या. ग्रामीण भागात शिक्षणाची वाणवा होती. शहरीकरणाकडे ओढा वाढत चालला होता. ग्रामीण भागात येण्यास, नोकरी करण्यास कुणीही धजावत नव्हते. ग्रामीण भागात शिक्षक किंवा अन्य विभागातील कर्मचाºयांना येण्या-जाण्यासाठी मुबलक वाहने नव्हती. तसेच राहण्याचीही व्यवस्था नव्हती. परिणामी शिक्षण, अधिकारी, कर्मचारी गावात महिन्यातून आठवड्यातून एकदा येत होते. याचा परिणाम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर पडत होता. सध्याच्या काळातही ग्रामीण भागातील शाळेवर असलेले शिक्षक, तलाठी व अन्य कर्मचारी गावात राहत नाहीत तर शहरातून अपडाऊन करतात. आजपासून शंभर वर्षांपूर्वीच्या काळात तर याहीपेक्षा भयंकर स्थिती होती. त्या काळात गावाच्या भल्याचा दूरगामी विचार करणारे नागरिक होते. अशाच नागरिकांपैकी एक होते बोथाकाजीचे प्रल्हादराव गावंडे. गावामध्ये शिक्षकांच्या राहण्याची सोय नाही, म्हणून शिक्षक गावात राहत नाहीत. तसेच येण्या जाण्याची मुबलक साधने नसल्याने नियमित येत नाहीत, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी शिक्षकांच्या राहण्यासाठी स्वखर्चाने व स्वतच्या जागेत सात ते आठ क्वार्टर बांधले. या क्वार्टरमध्ये शिक्षकांना मोफत राहण्याची सोय केली. त्यांच्याकडून कोणतेही भाडे घेतल्या जात नव्हते. शिक्षकांसाठी वास्तव्याची व्यवस्था केल्यामुळे शिक्षकांना गावात राहावे लागले. त्यामुळे शिक्षक दररोज शाळेत पूर्णवेळ थांबत होते. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळायला लागले. शिक्षकांसोबतच येथे आरोग्य कर्मचारी व अन्य कर्मचारीही व्यास्तव्यास राहत होते. त्यांच्याकडून कोणतेही भाडे घेतल्या जात नव्हते. गावातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे व त्यांचा विकास व्हावा, याकरिता शिक्षकांसाठी शिक्षकवाडी बांधण्यात आली. बहूतेक हे राज्यातील एकमेव खासगी क्वार्टर असावे. प्रल्हादराव गावंडे हे पंचायत समितीचे दहा ते पंधरा वर्षे सभापती होते. तसेच दहा वर्षे ते बुलडाणा जिल्हा परिषदेत उपाध्यक्षही होते. त्यांचे पुत्र माणिकराव गावंडे हे खामगावचे दहा वर्षे आमदार होते. बोथाकाजी हे छोटेसे गाव आहे. मात्र, या गावात सुरूवातीपासूनच बारावीपर्यंत शाळा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व पूश वैद्यकीय रूग्णालयही आहे. बोथाकाजी येथील शाळेत रोहणा, गणेशपूर, वरणा यासह आजूबाजूच्या गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत होते. हे विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान ये- जा करताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना गावंडे यांच्या वाड्यात राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करण्यात येत होती. अजूनही शिक्षकवाडीत नागरिक वास्तव्यास आहेत. गावात ज्यांच्याकडे घर नाही, असे लोक शिक्षकवाडीत राहत आहेत. त्यांच्याकडूनही कोणतेही भाडे घेतल्या जात नाही.