लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : उघड्यावर शौच करणाऱ्यांविरुद्ध सोमवारी पहाटे शेगाव न.प.च्या गुड मॉर्निंग पथकाकडून धडक कारवाई करण्यात आली. शहरातील सर्व स्पॉटवरून उघड्यावर शौचास बसलेल्या २५ लोकांना पकडून पोलीस व्हॅनमध्ये बसवून ठाण्यात नेण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी पंत यांनी या लोकांविरुद्ध कारवाईची मागणी केली. ही कारवाई सकाळी ५ ते ७ वा.दरम्यान करण्यात आली. तसेच शौचालय बांधण्यासाठी अनुदान घेऊन शौचालय न बांधणाऱ्यांविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी दिला. शेगाव नगर परिषदेने शहर स्वच्छतेच्या उपक्रमांतर्गत जनजागृती करून नागरिकांना त्यांचे घरी शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहित करीत ३१२६ नागरिकांना अनुदानाची पूर्ण रक्कम देण्यात आली आहे. मात्र त्यापैकी २३९३ लोकांनी शौचालय बांधून पूर्ण केले, तर ७३३ लोकांनी १०० टक्के पैसे घेऊनही शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले नाही आणि वरून हे नागरिक उघड्यावर शौचास बसून स्वच्छतेच्या उद्दिष्टाची वाट लावत आहेत. यामध्ये निरनिराळ्या स्पॉटवरून २५ लोकांना पकडण्यात आले. यामध्ये भिकाजी गवई यास दसरा मैदान येथून, शिवलाल माणिक पेटकर २. नं.शाळेजवळून, आकाश अशोक वाकोडे (हिवरा पाहुणा), योगेश उत्तम राजगुरे यास भोईपुुुराजवळून, संतोष सुरेश क्षीरसागर (बेलखेडचा पाहुणा) मुरारका शाळेजवळून, सोमेश्वर प्रकाश वाडे (सोनाळा पाहुणा), गजानन डुबाजी वानखडे (हिवरखेड रूपराव पाहुणा), गणेश जोतीराम इंगळे (हिवरखेड पाहुणा), किशोर कमल गवई (सोनाळा पाहुणा), राजाभाऊ वसंतराव देशमुख यास दसरा मैदान येथून, रामराव नाथाजी आठवडे यास गणेशनगर येथून, सुरेश सावळे यास तीन पुतळे परिसर येथून, रामकृष्ण सुखदेव काठोळे यास माळीपुरा येथून, पुंडलीक मोतीराम शेगोकार यास लहान तलाव येथून, प्रल्हाद शिवराव घुले यास धनगरपुरा येथून, मोहम्मद शफी शे. बिस्मिल्ला यास दौलत पुराजवळून, कैलास रामकृष्ण कळसकार यास इंदिरानगरजवळून, सहदेव सुखदेव शेगोकार यास इंदिरानगरजवळून, शंकर श्रीराम शेगोकार यास इंदिरानगरजवळून, भानुदास नारायण शेलारकर (गायगाव पाहुणा), रमेश सावजी वरणकार यास इंदिरानगरजवळून, शेषराव रामकृष्ण बसय्ये यास इंदिरानगरजवळून, दिलीप श्यामराव देशमुख यास बालाजी फैलाजवळून, पवन गजानन भामद्रे यास दसरानगरजवळून, मुकेश शेळके यास दसरानगरजवळून पकडण्यात आले. यामुळे शहरात उघड्यावर जाणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.गुड मॉर्निंग पथकाची कार्यवाही सुरुच राहील!मागील १८ महिन्यांपासून मुख्याधिकारी पंत यांनी गुड मॉर्निंग पथक नेमले आहे. ज्यामध्ये बचत गटातील महिलांचाही समावेश आहे. पहाटे ५ वा.पासून या पथकातील कर्मचारी उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना समजाविण्यासाठी व त्यांनी शौचालय बांधावे, हे पटवून देण्यासाठी कार्यरत असतात. मात्र तरीही नागरिकांचे उघड्यावर शौचालयास जाणे काही बंद झाले नाही. शेवटी सोमवारी मुख्याधिकारी पंत यांनी उघड्यावर बसणाऱ्यांना स्पॉटवरून पकडून पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसवून पोलीस ठाण्यात आणले. जेणेकरून पुढे हे लोक उघड्यावर बसणे टाळतील. जोपर्यंत उघड्यावर बसणे पूर्णपणे बंद होत नाही, तोपर्यंत ही कारवाई गुड मॉर्निंग पथकाकडून सुरूच राहील.
उघड्यावर शौच करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई
By admin | Published: May 16, 2017 1:06 AM