सिंदखेड राजा: राहुल गांधी यांच्या संदर्भात लागलेला निकाल म्हणजे न्यायव्यवस्थेवर पकड मिळवून या व्यवस्थेला बदनाम करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शाम उमाळकर यांनी केला. ते ४ एप्रिल रोजी सिंदखेड राजा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईचा सिंदखेड राजा येथे निषेध व्यक्त करण्यात आला असून, देशभरात काँग्रेस कार्यकर्ते निषेध नोंदवीत आहेत. काँग्रेस पक्षाकडून पुढे सरकार विराेधात अनेक आंदोलने केली जाणार असल्याचे उमाळकर यांनी यावेळी सांगितले. गुजरात न्यायालयाने दिलेला निर्णय अत्यंत गतीने मिळाला, असे उदाहरण कुठेच मिळणार नाही. त्याच गतीने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. हा प्रकार म्हणजे राहुल गांधी यांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सरकार पुरस्कृत प्रकार असल्याचे सांगून विरोधकांचा आवाज दाबण्याचा मोठा प्रयत्न केला जात आहे. संविधान बाजूला ठेवून देशात हुकूमशाही आणली जात असल्याचा आरोप उमाळकर यांनी यावेळी केला. पत्रकार परिषदेला रमेश कायंदे, अशोक पडघन, मनोज कायंदे, महेश जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात काँग्रेसचे प्रतिस्पर्धी भाजप, सेनाचजिल्ह्यात काँग्रेस पक्षाचा राजकीय प्रतिस्पर्धी भाजप आणि शिंदे गट शिवसेना असल्याचे पत्रकार परिषदेत शाम उमाळकर यांनी स्पष्ट केले. त्यांनी ठाकरे गट महाविकास आघाडीचा भाग असून जिल्ह्यात राष्ट्रवादी सोबत आम्ही २० वर्षांपासून काम करीत आहोत, त्यामुळे राष्ट्रवादी आमचा प्रतिस्पर्धी नसून भाजप व शिंदे शिवसेना हेच आमचे प्रतिस्पर्धी असल्याची भूमीका स्पष्ट केली.