जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव वाढत असून, कुठेही नियमांचे पालन होताना दिसत नाही. मंगळवारी जिल्हा प्रशासनाने तत्काळ आढावा बैठक घेऊन मास्क, फिजिकल डिस्टसिंगचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभाग व नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिले. मंगळवारी सकाळपासूनच पोलीस विभाग व नगर परिषदेने विना मास्क वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरू केले. पाच हजार रुपये दंड वसूल केले आहे. मास्क न लावता वाहन चालविणाऱ्यांवर पाचशे रुपये दंड व गर्दीच्या ठिकाणी मास्क न घालता मोकाट वावरणाऱ्यांवर दोनशे रुपये दंड व व्यवसायिकांना नियमांचे उल्लंघन केल्यावर पाच हजार रुपये दंड करण्यात येत असल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळपासूनच पोलीस ठाण्याच्या समोर ठाणेदार आत्माराम प्रधान, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे, उपमुख्य अधिकारी रवींद्र वाघमोडे, नगरपरिषदेचे कर निरीक्षक सुधीर सारोळकर, संतोष हिवाळे, सय्यद अख्तर, संजय गिरी, अनिल मुळेसह नगरपरिषदेचे पथकांनी विना मास्क वाहन चालवीत असलेल्या दुचाकी वाहनधारकांवर कारवाई करून पाच हजार शंभर रुपये दंड वसूल केला. नागरिकांनी मास्कचा वापर करून फिजिकल डिस्टसिंगचे पालन करावे व सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन ठाणेदार आत्माराम प्रधान व मुख्याधिकारी सचिन गाडे यांनी केले आहे.
मास्कचा वापर न करणाऱ्यावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 5:04 AM