खामगाव : भाजपात प्रवेश केलेल्या नगरपरिषदेच्या दोन अपक्ष नगरसेविकांना अपात्र घोषित करण्यात आले. ही कारवाई जिल्हाधिका-यांनी मंगळवारी केली. खामगाव नगरपरिषदेच्या २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक २ अ मधून शहेरबानो जहिरउल्लाशाह व प्रभाग क्रमांक १२ ब मधून जकियाबानो शेख अनिस यांनी अपक्ष म्हणून अल्पसंख्यांक बहूल वस्तीमधून निवडणूक लढवली होती. त्यांनी निवडून आल्यानंतर काँग्रेस पक्षासोबत राहू असे मतदारांना प्रचारादरम्यान सांगितले होते. पंरतू नगर परिषदेमध्ये भाजपाची सत्ता आल्याने सत्तेच्या लालसेपोटी ज्यांनी त्यांना निवडून दिले. त्या मतदारांचा विश्वासघात करीत त्या भाजपा आघाडी खामगाव मध्ये सामील झाल्या. या प्रकाराबाबत नगरसेविका शहेरबानो जहिरउल्लाशाह व जकियाबानो शेख अनिस यांची नगरपरिषदेच्या सदस्य पदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी याचिका भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या गटनेत्या अर्चना टाले व नगरसेवक इब्राहिम खान यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ८ फेब्रुवारी रोजी याचिका दाखल केली होती. याप्रकरणी निर्णय घेण्यात जिल्हाधिका-यांकडून विलंब होत असल्याने याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हाधिका-यांनी या दोन्ही नगरसेविकांना अपात्र घोषित केले.
खामगाव नगरपरिषदेच्या दोन अपक्ष नगरसेविका अपात्र, जिल्हाधिका-यांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 4:07 PM