लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : कोरोना रुग्णांचे खासगी रुग्णालय सर्रास सीटी स्कॅन करत आहेत. एचआरसीटी स्कोर तपासणीच्या नावावर हजारो रुपयांची लूट रुग्णांच्या नातेवाइकांकडून करण्यात येत आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार दर निश्चित करून दिले आहेत. या दराचे उल्लंघन होत असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. एचआरसीटी करण्याची आवश्यकता नसल्याचे केंद्रीय पथकाने म्हटले होते. खासगी रुग्णालये प्रत्येक कोरोना रुग्णाला सीटीस्कॅन करण्याचा आग्रह धरत आहेत. एचआरसीटीसाठी रुग्णांची लूट केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याची दखल घेऊन एचआरसीटीचे दर निश्चित केले आहेत.काेराेना संक्रमण वाढल्याने पाॅझिटीव्ह रुग्णांमध्ये भितीचे वातावरण आहे.त्यामुळे, डाॅक्टरांनी केलेल्या सर्वच टेस्ट रुग्ण करीत असल्याचे चित्र आहे.याचाच फायदा काही सीटीस्कॅन करणारे सेंटर व रक्त तपासणी करणाऱ्या लॅब घेत असल्याचे चित्र आहे. दर निश्चित झाल्याने सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
या कायद्यानुसार कारवाई एचआरसीटी चेस्ट तपासणीसाठी निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दराची आकारणी केल्यास संबंधितांवर साथरोग कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, मेस्मा ॲक्ट २०११, द मुंबई नर्सिंग होम ॲक्ट २००६, अ बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट १९५० नुसार कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
संपूर्ण तपासणी अहवाल देणे बंधनकारक कोरोनाबाधित रुग्णांची तपासणी केल्यानंतर अहवालावर कोणत्या सीटीस्कॅन मशीनद्वारे तपासणी केली आहे. हे नमूद करणे बंधनकारक आहे. नोंदणीकृत डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय ही तपासणी करू नये. एचआरसीटी-चेस्ट तपासणी अहवाल रेडिओलॉजिस्टने देणे आवश्यक राहील. तपासणीसाठी निश्चित केलेले दर खासगी रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटरच्या बाहेर दर्शनीभागात लावण्यात यावेत. हे दर साथरोग कायद्याची अंमलबजावणी असेपर्यंत राहतील.