नरवेल : धुपेश्वर, हिंगणा नागपूर, म्हैसवाडी, चिंचोल भागातील पूर्णा नदीपात्रामध्ये रेती माफियांकडून मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात येत आहे. महसूल विभागाने २३ एप्रिल रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान धाड टाकुन दोन ट्रॅक्टरसह चार गुळगुळी यंत्र जप्त केले.
धुपेश्वर, हिंगणा नागपूर, कोटेश्वर, म्हैसवाडी, चिंचोल शिवारामध्ये पुर्णा नदीच्या पात्रामध्ये अवैध रेती उपसा करण्यात येत आहे. पूर्णा नदीच्या पात्राची पूर्णपणे चाळण करण्यात आली आहे. रेतीची ट्रक्टर, टिप्परद्वारे वाहतूक करण्यात येते. यामुळे काही अपघात सुद्धा घडले आहेत. तहसीलदार राहुल तायडे यांच्या आदेशान्वये महसूल विभागाच्याा पथकाने अवैध रेती उपसा करणार्यांवर धाड टाकली. महसूल विभागाच्या पथकाने सुरूवातीला म्हैसवाडी शिवारात धाड टाकली. परंतु तिथे त्यांना साहित्य मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी नरवेल- हिंगणा नागापूर येथे धाड टाकली.
या ठिकाणी पुर्णा नदी पात्रातील ट्रॅक्टर, गुळगुळी यंत्रासह ईतर साहित्य लपवून ठेवल्याचे आढळले. यादरम्यान काही रेतीवाहतूक करणारे ट्रक्टर घेवून पसार झाले. महसुल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आजूबाजूचा परिसर पूर्णपणे पिंजून काढला. ही कारवाइ सायंकाळपासून तर मध्यरात्री ३ वाजेपर्यंत करण्यात आली. ही कारवाई तहसीलदार राहुल तायडे, मंडळ अधिकारी वानखेडे, तलाठी कौशल महाजन, तलाठी वायाळ, पोलीस पाटील योगेश पाटील, सुरक्षारक्षक विजय राजपूत, वाहनचालक दिलीप तायडे यांनी केली.
ट्रक्टरचे तोडले वायरमहसूल विभागाचे पथक जप्त केलेले ट्रक्टर तहसील कार्यालयात नेतात. त्यामुळे रेती माफियांनी ट्रक्टरच्या वायर तोडल्या. ट्रक्टर सुरू न झाल्यामुळे महसूल विभागाची चांगलीच दमछाक झाली.